'… असं असेल तर मी हात जोडून माफी मागते'; वर्षा उसगावकरांनी कोळी समाजाची मागितली माफी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:28 PM2022-09-07T20:28:57+5:302022-09-07T20:29:23+5:30
Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या त्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत आहेत. त्या बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. मात्र यावेळी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. वर्षा उसगावकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली आहे.
वर्षा उसगावकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची माफी मागितली आहे. त्या म्हणाल्या की, ऑनलाईन कंपनीबाबत बोलताना काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील. तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणतंही हेतू नव्हता. आणि मला कोळी समाजाचा नितांत आदर आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांची हात जोडून माफी मागते'.
काही दिवसांपूर्वी वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एका मासे विक्रेत्या कंपनीची जाहिरात केली होती. तर बाहेरील मासे विक्रेत्या महिला मासे घेताना कशी ग्राहकांची फसवणूक करतात असे त्यात म्हटले होते. मात्र यावर कोळी बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. यावर अखिल महाराष्ट्र मच्छिमार समितीने ही निषेध नोंदवत म्हटले होते की, वर्षा उसगावकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिने सृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि यातून गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत असल्याचं अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील म्हटलं आहे. सोबतच त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता. आता वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची माफी मागून या वादावर पडदा टाकला आहे.