वेळ असता तर मराठी रंगभूमीवर काम करण्याची इच्छा होती, पद्मिनी कोल्हापुरे यांनी व्यक्त केले मराठी रंगभूमीवर असलेले प्रेम...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 12:42 PM2018-11-03T12:42:06+5:302018-11-03T12:43:34+5:30
वर्षानुवर्षे नाटकं रंगभूमीवर सुरूच राहतात. त्यामुळे नाटकावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष देण्यास तितकासा वेळ मिळत नाही असं पद्मिनी कोल्हापुरे यांनी म्हटले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. हिंदीत बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेल्या इन्साफ का तराजू, आहिस्ता आहिस्ता, प्रेमरोग, विधाता, प्यार झुकता नहीं, सौतन, वो सात दिन यासह विविध सिनेमांनी रसिकांच्या मनावर गारूड घातलं. मराठीतही त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. चिमणी पाखरं आणि मंथन या सिनेमातून त्यांनी मराठी रुपेरी पडद्यावरही छाप पाडली. आता बऱ्याच वर्षानंतर म्हणजेच तब्बल 14 वर्षांनी त्या पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. 'प्रवास' या सिनेमातून त्या पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने मराठी रंगभूमी आणि मराठी नाटक याबाबत असलेले प्रेम त्या लपवू शकल्या नाहीत. मराठी रंगभूमीवर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाट्यकृती गाजल्या आहेत आणि गाजतही आहेत. आपल्याला वेळ असता तर मराठी नाटकांमध्ये काम करायला नक्की आवडलं असतं असं पद्मिनी कोल्हापुरे यांनी म्हटले आहे. सिनेमाला एक मर्यादा असते, म्हणजेच सिनेमा एका विशिष्ट तारखेला सुरु होतो आणि ठराविक काळानंतर तो संपतो. मात्र नाटकांचं तसं नाही. वर्षानुवर्षे नाटकं रंगभूमीवर सुरूच राहतात. त्यामुळे नाटकावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष देण्यास तितकासा वेळ मिळत नाही असं पद्मिनी कोल्हापुरे यांनी म्हटले आहे. चिमणी पाखरं या सिनेमातून पद्मिनी कोल्हापुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी मंथन या सिनेमातही काम केले.