ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
By श्रीकिशन काळे | Published: April 27, 2024 07:58 PM2024-04-27T19:58:39+5:302024-04-27T19:59:22+5:30
मुलांना किंवा घरच्यांना त्याच्यात नका ओढू. त्याविषयी कायदा यायला हवा. शिवीगाळ असेल तर त्यांना दोन महिने तुरूंगात टाका. असा नियम काढायला हवा. त्याची केस पण करू नका. कारण कोर्टात खूप केस आहेत. - महेश मांजरेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘ आज ट्रोलिंग खूप होते. ट्रोलर्समधून तुम्हाला कळत असेल की मी किती वाईट आहे. हल्ली सर्व गोष्टी यूट्यूबवर असतात. मी इन्स्टावर काही टाकत नाही. माझे प्रतिनिधी ते टाकतात. माझे काम आवडले नाही तर त्याविषयी ट्रोल झालं तर चालेल, पण माझ्या आई-वडिलांविषयी बाेललं तर मला चालणार नाही. अशा वेळी मी गप्प बसत नाही. मुलांना किंवा घरच्यांना त्याच्यात नका ओढू. त्याविषयी कायदा यायला हवा. शिवीगाळ असेल तर त्यांना दोन महिने तुरूंगात टाका. असा नियम काढायला हवा. त्याची केस पण करू नका. कारण कोर्टात खूप केस आहेत. केवळ समजलं तर लगेच त्याला तुरूंगात टाका आणि तरच ते बंद होईल. कोणी काय नाव ठेवावे, हे त्याचा प्रश्न आहे,’’ अशा कडक शब्दांत अभिनेते महेश मांजरेकर यांनी ट्रोलिंगवर आसूड ओढले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर शनिवारी (दि.२७) मांजरेकर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी गप्पा माऱल्या. मांजरेकर म्हणाले, मला सांस्कृतिक मंत्री केले तर आवडेल. सांस्कृतिक मंत्री झाल्यावर अगोदर सबसिडी बंद करेन. माझं म्हणणं आहे तेच पैसे थिएटर बनवायला वापरू. राज्यात चित्रपट व्यवसाय वाढवायचा असेल तर थिएटर वाढवायला हवेत, असे मांजरेकर म्हणाले.
छोट्या छोट्या गावात थिएटर हवे. तिथे शंभर प्रेक्षक बसतील, असे थिएटर बांधा. तिथेच एक फूड मॉल तयार करा. तिथे घरातले जिन्नस मिळतील, असा मॉल करा आणि एक कॉफी शॉपही बनवा. तरच त्या ठिकाणी लोकांची गर्दी होईल. त्यातून रोजगारही मिळेल, असे मांजरेकरांनी सुचविले.