'त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले...', क्रांती रेडकरने सांगितला तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 03:25 PM2023-07-18T15:25:34+5:302023-07-18T15:25:53+5:30
Kranti Redkar : नुकतेच क्रांतीने तिला आलेला एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आणि तिने या व्हिडीओत त्या एका मिनिटांमध्ये मी १७ हजार वेळा मेले असे म्हटले आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच वेगवेगळे रील्स, व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. कधीकधी तिचे व्हिडीओ मजेशीरदेखील असतात. नुकतेच क्रांतीने तिला आलेला एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आणि तिने या व्हिडीओत त्या एका मिनिटांमध्ये मी १७ हजार वेळा मेले असे म्हटले आहे.
क्रांती रेडकर हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओबद्दल म्हटले की हा किस्सा तिच्यासोबत खूप वर्षांपूर्वी घडला होता. अभिनेत्री म्हणते की, 'माझी एक नीलम नावाची हेअर ड्रेसर आहे. जेव्हा नीलम नसते तेव्हा ती तिच्या जागी कोणाला तरी पाठवते किंवा प्रोडक्शनकडून हेअर ड्रेसर पाठवली जाते. एकदा रिप्लेसमेंट म्हणून एक हेअर ड्रेसर आली होती. तिच्या तोंडाला जो वास येत होता, तो चक्कर आणणारा होता.'
क्रांती पुढे म्हणाली की, 'मी तिला अनेकवेळा आडूनआडून सांगितले की तुम्हाला मिंट हवी आहे का? तर ती म्हणायची मला मिंट आवडत नाही. च्युईंगम खाणार का विचारल्यावरही ती म्हणाली की तो पेपरमिंटचा वास मला आला ना की मला कसेतरी होते.' ती म्हणते की तिच्या तोंडाच्या वासाने मला कसेतरी होत होते त्याचे काय? तिला त्याची काही पडलीच नव्हती. तिला सांगायचे कसे हादेखील प्रश्न होता. मी सांगितलेच नाही.'
क्रांती म्हणाली की, ज्या बाजूला केसांचे स्ट्रेटनिंग करायची त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला ती तोंड वळवून घ्यायची. शिवाय त्या हेअर ड्रेसरची बडबड चालू असल्यामुळे आणखी वास येत होता. क्रांतीने सांगूनही ती शांत बसत नव्हती. तिने पुढे सांगितले की, एका क्षणाला असे झाले की क्रांती मागे जात असताना तिच्या हातातील स्ट्रेटनिंग मशिन क्रांतीच्या कपाळाला लागले. मी ओरडल्यानंतर तिने सॉरी म्हटले आणि जळतंय का असे विचारुन फू फू करुन फुंकर मारली. त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले'.