'संगीत देवबाभळी' नाटकाचा बीए अभ्यासक्रमात समावेश
By संजय घावरे | Published: September 1, 2023 11:11 AM2023-09-01T11:11:37+5:302023-09-01T11:11:59+5:30
Sangeet Devbabhali : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक अनोखे उदाहरण सादर करत रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा बीए अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांना 'देवबाभळी'चा अभ्यास करता येणार आहे.
>> संजय घावरे
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक अनोखे उदाहरण सादर करत रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा बीए अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांना 'देवबाभळी'चा अभ्यास करता येणार आहे.
निर्माते प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेले 'संगीत देवबाभळी' नाटक भगवान विठ्ठलाची पत्नी रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांच्या पत्नी आवली यांच्यातील संवादांवर आधारलेले आहे. प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या या नाटकाचा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर रोजी रसिकांसमोर सादर होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यापूर्वीच हे नाटक कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठामध्ये बीए मराठीच्या अभ्यासक्रमात सामील करण्यात आल्याची बातमी आली आहे. शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी या नाटकात अभिनय केला आहे.
याविषयी 'लोकमत'शी बोलताना प्रसाद कांबळी म्हणाले की, प्रचंड मेहनतीने रंगभूमीवर आणलेल्या आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश होणे ही संपूर्ण टिमसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. 'देवबाभळी' नाटकावर आधारलेल्या आणि पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. मुंबई विद्यापीठसह कोकणातील देवरुख शिक्षण संस्थेनंतर आता कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या नाटकाचा समावेश केला आहे. एखाद्या तरुण लेखकाच्या पहिल्याच व्यावसायिक नाट्यकृतीचे पुस्तक प्रकाशित होणे आणि नाटकाला ४४ पुरस्कार मिळणे ही खूप मोठी बाब आहे, पण हा पुरस्कार त्याहीपेक्षा मोठा आहे. यापुढे हे नाटक लाईफटाईम अभ्यासक्रमात राहील. कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या नाटकाचा शेवटचा प्रयोग होणार असून, ठिकाण लवकरच घोषित करण्यात येईल.
'देवबाभळी'चे लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख म्हणाले की, मी अभ्यास करत असताना जेव्हा अशा पुस्तकांचा अभ्यास करायचो, तेव्हा आपले कधी पुस्तक असे कधी अभ्यासले जाईल असा विचारही केला नव्हता. हा एक प्रकारचा पुरस्काराच असून त्याचा खूप आनंद आहे. हे नाटक मी सादरीकरणासाठी लिहिले होते. अभ्यासक्रमात सामील होण्याची प्रोसेस मला माहित नाही. हे विद्यापीठ पातळीवर ठरवले जाते. याबाबत माझ्याशी संपर्क साधला गेला नाही. मलाही अभ्यासक्रम जाहिर झाल्यावर बाहेरूनच समजले.
............................
- नंदकुमार मोरे (मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ)
'देवबाभळी'च्या निमित्ताने जुन्या आणि साहित्यमूल्ये असणाऱ्या कलाकृतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा या हेतूने जुन्या आणि चांगल्या दर्जाचे साहित्य विद्यार्थांना शिकवण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने याचा नव्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यातून साहित्यिक मने पुन्हा घडतील अशी अपेक्षा आहे.