'इंडियन आयडॉल'फेम सलमान अलीची मराठीत एण्ट्री; 'या' चित्रपटातून मिळाला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:49 PM2022-06-07T12:49:55+5:302022-06-07T12:51:11+5:30
Salman ali: 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक सलमान अली मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.
आज मराठी सिनेसृष्टीचा डंका संपूर्ण जगभरात वाजत आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत सर्वच ठिकाणी मराठीचा झेंडा डौलानं फडकत आहे. त्यामुळेच सध्या अनेक भाषिक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते वा गीतकार, संगीतकार मराठी कलाविश्वात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक सलमान अली (salman ali) मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.
'अन्य' या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून सलमान मराठीत पदार्पण करत आहे. सिम्मी जोसेफ दिग्दर्शित चित्रपटासाठी सलमान अलीने गाणं गायलं आहे. त्यामुळे हिंदीसह मराठीत पार्श्वगायक करण्याची त्याची इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. या चित्रपटातील हिंदी गाण्यासोबतच मराठीतील 'ऐक पाखरा...' हे मराठी गाणं त्याने गायलं आहे.
प्रशांत जमादार आणि संजीव सारथी यांनी या गाण्याचं लेखन केलं असून सुमधूर संगीतसाज चढवण्याची जबाबदारी संगीतकार रामनाथ यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. हिंदीमध्ये हे गाणे 'ओ रे परींदे...' असं आहे. हे गाणं संजीव सारथी यांनी लिहिलं आहे. हे गाणंसुद्धा रामनाथ यांनीच संगीतबद्ध केलं आहे. 'अन्य'सारख्या समाजातील महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत असल्याचं सलमानने यावेळी म्हटलं.
दरम्यान, 'अन्य'मध्ये रायमा सेन, अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. समाजातील ज्वलंत मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा 'अन्य' १० जून रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.