इंटरनेटवरील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची ही माहिती चुकीची!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 05:48 AM2017-11-03T05:48:08+5:302017-11-03T11:28:52+5:30

कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली.करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो ...

This information about Laxmikant Berde on the Internet is wrong! | इंटरनेटवरील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची ही माहिती चुकीची!

इंटरनेटवरील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची ही माहिती चुकीची!

googlenewsNext
मेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली.करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही.अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे सा-यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. सा-याचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जन्म तारीख  जाणून घेण्याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता असते. इंटरनेटवर लक्ष्याच्या जन्म तारखेची नोंद 3 नोव्हेंबर 1954 अशी आहे. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांची ही जन्म तारीख चुकीची आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा यांचा जन्म 26 ऑक्टोबर  झाला असून तिथीनुसार तो लक्ष्मीपूजनला साजरा केला जात असल्याची माहिती खुद्द प्रिया बेर्डे यांनी सीएनएक्समस्तीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. इंटरनेटवर मिळणारी सगळीच माहिती खरी असेल असं नाही. त्यामुळे इंटरनेटवरील अशीच चुकीची माहिती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जन्म तारखेबाबत उपलब्ध होती.मात्र इंटरनेटवरील 3 नोव्हेंबर 1954 ही तारीख नंतर 26 ऑक्टोबर अशी अपडेट करत विकीपिडीयाने चूकही सुधारली आहे.मात्र लाडक्या लक्ष्याची खरी जन्म तारीख कोणती यावरुन त्यांच्या रसिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जाणून घेऊयात,लक्ष्याविषयी आणखी काही खास गोष्टी ...

रंगभूमीवरील ‘टुरटुर’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्याचं पहिलं नाटक रसिकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर ‘शांतेचं कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा नाटकातून त्याच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. त्यानंतर मात्र त्यानं मागं वळून बघितलंच नाही. सिनेमात त्यानं पाऊल ठेवलं आणि बघता बघता लक्ष्मीकांत बेर्डे या लहानथोरांचा ‘लाडका आणि हवाहवासा लक्ष्या’ बनला.

१९८५ साली आलेल्या ‘धुमधडाका’ सिनेमातून लक्ष्यानं ख-या अर्थानं धुमधडाका केला. कारण या सिनेमातून लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे ही ‘त्रयी’ पहिल्यांदाच एकत्र आली. यांत तिघांच्या अभिनयाची भट्टी अशी काय जमली की नंतरच्या काळात महेश कोठारे यांनी लक्ष्याला घेऊन सिनेमांचा धडाकाच लावला. लक्ष्या आणि अशोक सराफ हे महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमाचं जणू समीकरणच बनलं. त्यांच्या चित्रपटांमधून लक्ष्यानं ख-या अर्थानं यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. धुमधडाकानंतर ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधून ‘लक्ष्या-महेश’ची जादू पाहायला मिळाली.

मराठीत विनोदी सिनेमांच्या माध्यामातून लक्ष्या चांगलाच धुमाकूळ घालत होता. त्याला नजरेसमोर ठेवून सिनेमाच्या कथा लिहल्या जाऊ लागल्या. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’ या त्याला मिळालेल्या नावाची लोकप्रियता कॅश करता करता सिनेमा हिट करण्याचा फंडाही वापरला गेला.
 
मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्याने छान निभावली. मात्र अभिनयाचा कस लागतील अशा भूमिका मराठीप्रमाणे हिंदीतही अभावानेच मिळाल्या. मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका लक्ष्याच्या वाट्याला फार काही आल्याच नाहीत.
 
असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेला कलाकार चाहत्यांना अखेर पर्यंत हसवत राहिला. किडणीसारख्या महाभयंकर आजाराची चाहूल कुणालाही लागू न देता सा-यांच्या लाडक्या लक्ष्यानं १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यानं साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्यात. त्यामुळं आठवणीतल्या लक्ष्या तुला विसरणं कुणालाही शक्य नाही.

Web Title: This information about Laxmikant Berde on the Internet is wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.