कधीही अष्टविनायकाचं दर्शन घेतलं नाही, मग 'अष्टविनायक महिमा' गाणं कसं सुचलं? सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 11:21 AM2024-09-08T11:21:34+5:302024-09-08T11:22:03+5:30
तब्बल १६ मिनिटांचं 'अष्टविनायक महिमा' गाणं कसं सुचलं? सचिन पिळगावकरांनी सांगितला खास किस्सा
सचिन पिळगावकर यांच्या सिनेप्रवासातील महत्वाच्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'अष्टविनायक'. हा सिनेमा मराठीतला एक क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमात सचिन यांनी प्रमुख भूमिका केली होती. या सिनेमातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली. यापैकी प्रमुख गाणं म्हणजे 'अष्टविनायका तुझा महिमा कसा'. हे गाणं कसं सुचलं? एकाही मंदिरात न जाता खेबुडकरांनी हे गाणं कसं लिहिलं, याचा खास किस्सा सचिन पिळगावकरांनी उलगडला आहे.
एकाही मंदिरात न जाता खेबुडकरांनी लिहिलं गाणं
सचिन पिळगावकर-सुप्रिया पिळगावकर यांनी माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत हा रोमांचक किस्सा सांगितला. १९७९ साली आलेल्या 'अष्टविनायक' सिनेमातील 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' हे गाणं आजही रसिकांच्या स्मरणात आहे. हे गाणं जगदीश खेबुडकरांनी लिहिलं होतं. विशेष म्हणजे जगदीश यांनी कधीही अष्टविनायकाचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यांना त्या मंदिरांबद्दल काही माहिती नव्हती. परंतु त्यांनी अष्टविनायकाचं वर्णन असणारं पुस्तक वाचलं. ते वाचल्यानंतर त्यांनी गाण्याचा मुखडा सांगितला तो असा की, 'अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा.' या मुखड्याला अनिल-अरुण यांनी चाल दिली.
दुपारी तीनला काम सुरु झालं ते पहाटे चारला संपलं
दुपारचे तीन वाजले होते. सर्व जेवून गाण्यावर काम करायला बसले होते. पुढे जगदीश यांनी काव्यात्मक स्वरुपात अष्टविनायकाच्या ओळी गायला सुरुवात केली. 'मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर, ११ पायरी हो', इथून त्यांनी सुरुवात केली. पुढे एक एक करुन खेबुडकरांनी अष्टविनायकाचं गाणं लिहिलं. शेवटच्या गणपतीचं वर्णन करताना त्यांनी आरती स्वरुपात ते कडवं लिहिलं. दुपारी तीन वाजता सुरु झालेलं काम पुढच्या दिवशी पहाटे चार वाजता संपलं, अशाप्रकारे अष्टविनायक मंदिरात कधीही न गेलेल्या खेबुडकरांनी 'अष्टविनायका तुझा महिमा कसा', हे अजरामर गाणं लिहिलं.