"सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट

By तेजल गावडे | Published: July 30, 2021 05:45 PM2021-07-30T17:45:29+5:302021-07-30T17:46:02+5:30

अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स २' वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे.

It was more fun to play the role of Purnima in 'City of Dreams 2' - Priya Bapat | "सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट

"सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट

googlenewsNext

अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स २' वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. दुसऱ्या सीझनमध्ये बाप-लेकीत सत्तेचा खेळ रंगणार आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...

- तेजल गावडे.

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सिटी ऑफ ड्रिम्स २'च्या शूटिंगचा अनुभव कसा होता?   
''सिटी ऑफ ड्रिम्सच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग आम्ही सुरू केले. काही भागांचे शूटिंग केल्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे हे शूटिंग पण थांबवण्यात आले. मग डिसेंबरमध्ये जेव्हा हळूहळू परिस्थिती आटोक्यात येऊ लागली आणि अनलॉक झाले. शूटिंगला परवानगी मिळाली. त्यानंतर मग उरलेल्या भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले. पण कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सेटवर खूप काळजी घेतली जात होती. शूटिंगला जाण्याआधी प्रत्येकाची कोरोनाची आरटी पीसीआर टेस्ट केली जायची. तसेच टेम्परेचर, ऑक्सिजनची पातळी चेक केली जायची. बॅगा आणि सामान सॅनिटाइज केले जायचे. मेकअप व्हॅन दिवसातून दोनवेळा पूर्ण सॅनिटाइज केल्या जायच्या. तसेच सेटवर सगळे कलाकार आणि इतर टीम मास्क घालून असायची. फक्त शूटवेळी मास्क काढला जायचा. शूटच्या आधी रिहर्सलदेखील आम्ही मास्कमध्ये केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप काळजी घेतली गेली. मी आमच्या प्रोडक्शन हाउसला खरंच सलाम करते. कारण त्यांनी आमच्या सर्वांची खूप काळजी घेतली आहे.

- सिटी ऑफ ड्रिम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये काय पहायला मिळणार आहे?
पूर्णिमा गायकवाड कशी गृहिणी होती आणि ती राजकारणात कधी प्रवेश करेल, असे वाटत नव्हते. पण तिची कुठेतरी महत्त्वकांक्षा आणि स्वप्न होती. जी कधीच पूर्ण करू दिली नव्हती. वडिलांची इच्छा होती की कायम ते मुलानेच करावे आणि ज्यावेळी आतून तिला जाणीव होते की हेदेखील मी करायला पाहिजे. मी सतत माझे मन मारून जगले नाही पाहिजे. त्यावेळेला ती मोठा निर्णय घेते आणि तिच्या महत्त्वकांक्षेच्या दिशेने प्रवास करायला सुरूवात करते, हे पहिल्या सीझनमध्ये पहायला मिळाले. आता ती मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करणार आहे. पहिल्या सीझनमध्ये तिने जे काही पराक्रम केले आहेत. त्याचे तिला फळ भोगावे लागणार आहे. कारण आता तिची लढत फक्त तिच्या भावासोबत नाही आहे. कारण तो तिच्या पेक्षा कमी क्षमतेचा होता. पण आता ती थेट तिच्या वडिलांच्या विरोधात उभी राहणार आहे. इतक्या वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेले तिचे वडील तिच्या विरूद्ध काय खेळी करतात आणि ती त्यातून सावरते का आणि ती वडिलांविरोधात कशी लढते, हे दुसऱ्या भागात पहायला मिळणार आहे.

- या भूमिकेची तयारी कशी केलीस?
नागेश सरांचे स्क्रिप्ट खूप कमाल आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचे एकदा स्क्रिप्ट वाचली की तुम्हाला सगळ्याचा अंदाज येतो. पहिल्या सीझनमध्ये दहा भागांमध्ये त्या पात्रासोबत वेळ घालवल्यानंतर त्या माणसाला खूप जवळून ओळखतो. पूर्णिमा गायकवाड पात्रासोबत खूप जवळून संबंध आला. तिला जवळून ओळखता आले. त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये ती काय प्रकारे विचार करत असेल, काय प्रकारे तिची देहबोली बदलेल हे समजले होते. प्रॅक्टिकली मी गोष्टीचा अनुभव घेतला आहे.  कलाकार एखादी भूमिका साकारत असताना भावनिकरित्या कलाकार त्या त्या स्तरातून जात असतो. त्यामुळे ते पात्र दुसऱ्या सीझनमध्ये साकारायला खूप जास्त मजा आली. मी पहिल्या सीझनमध्ये पूर्णिमा गायकवाड साकारताना माझ्या मनावर दडपण होते. तितकेच जास्त मी दुसऱ्या सीझनमध्ये एन्जॉय केले.

-दिग्दर्शक आणि सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
दिग्दर्शक नागेश सरांसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. सगळे कलाकार पहिल्या सीझनमध्ये होते. त्यामुळे सगळ्यांसोबत पुन्हा काम करायला मजा आली. फक्त दुसऱ्या सीझनमध्ये सुशांत सिंगची एन्ट्री झाली. त्यामुळे त्याच्यासोबत काम करता आले. पण आमचे जास्त सीन नसल्यामुळे मी एक दिवस त्याच्यासोबत काम केले. पहिल्या सीझनमध्ये मी दिग्दर्शक नागेश सरांचा हात पकडून हे पात्र साकारले. तर दुसऱ्या सीझनमध्ये मी त्यांच्यासोबत माझ्या कामात योगदान देण्याचा प्रयत्न करत होते. आपण पुर्णिमा असे करायला सांगूयात का किंवा ती अशी दिसेल का अशा चर्चा मी त्यांच्यासोबत केल्या. तर या गोष्टीत मी सहयोग दिला. त्या पात्रात मी जास्तीत जास्त वेळ घालवल्यामुळे हे दुसऱ्या सीझनमध्ये शक्य झाले.

Web Title: It was more fun to play the role of Purnima in 'City of Dreams 2' - Priya Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.