संदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:45 PM2022-08-30T18:45:00+5:302022-08-30T18:45:00+5:30
Sandeep pathak: १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. यात 'राख'ने बाजी मारली
संदीप पाठक (sandeep pathak) याची मुख्य भूमिका असलेला 'राख' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चिला जात आहे. उत्तम कथानक आणि दर्जेदार मांडणी यामुळे या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप पाडली आहे. यामध्येच आता संदीपच्या पदरात आणखी एक यश पडलं आहे. नुकत्याच झालेल्या जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठकला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. ‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी आहे, असं संदीप म्हणाला.
दरम्यान, 'राख' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.