"मला उघडपणे खूप घाण बोलायचं आहे, पण...", जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्नेहल तरडेंची संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:29 IST2025-04-23T11:24:18+5:302025-04-23T11:29:21+5:30
अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री स्नेहल तरडेंनीदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

"मला उघडपणे खूप घाण बोलायचं आहे, पण...", जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्नेहल तरडेंची संतप्त पोस्ट
जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १०च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
सोशल मीडियावरही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री स्नेहल तरडेंनीदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "मला उघडपणे खूप घाण बोलायचं आहे....एकांतात शिव्या देऊन मन शांत होणार नाही', असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या आणि त्यांच्याबद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही केवढी खेदाची बाब आहे", असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
टीआरएफने घेतली हल्ल्याची जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने (टीआरएफ) स्वीकारली आहे. या संघटनेने म्हटले आहे की, परप्रांतीय लोक पर्यटक बनून येतात, मग मालकासारखे वागतात. अशा लोकांना धडा शिकविण्यात येईल, असा दर्पोक्ती या संघटनेने केली आहे. गेल्या वर्षीही हल्ला: काश्मीरमध्ये गेल्या वर्षी राजस्थानच्या एका दाम्पत्यावर गोळीबार झाला होता. १८ मे २०२४ रोजी रात्री दोन ठिकाणी हल्ले झाले. भाजपचे स्थानिक नेते एजाज अहमद शेख यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.