जनमन - शहरातल्या एकाकी मृत्यूपेक्षा हे बरे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 01:19 PM2023-07-19T13:19:03+5:302023-07-19T13:19:47+5:30
परिस्थिती गरीब, हलाखीची असेल, तर म्हातारपण अधिकच त्रासाचे असते हे खरे
अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या एकाकी मृत्यूने महत्त्वाचा आणि क्लेशदायी प्रश्न समोर आणला आहे : एकाकी वार्धक्य! महाजनी प्रसिद्ध असल्याने त्यांच्या एकाकी मृत्यूची चर्चा झाली एवढेच; पण त्यांच्यासारखाच प्रश्न आज अनेक शहरी वृद्धांच्या समोर असणार, हे खरेच! कारणे काहीही असोत, एकाकीपण टळलेले नाही.
परिस्थिती गरीब, हलाखीची असेल, तर म्हातारपण अधिकच त्रासाचे असते हे खरे; पण हल्ली सुखवस्तू, श्रीमंत वृद्धांवरही ही दुःखद वेळ यावी, हे अनाकलनीय आहे. श्रीमंत वृद्धांनी असे दुःखद मरण येऊ नये यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, तसेच योग्य ती पूर्वतयारीही वेळेत करणे महत्त्वाचे वाटते. मोठ्या शहरातील श्रीमंत वृद्ध एकाकी पडत असल्यास त्यांनी खुशाल शहरे सोडून ग्रामीण भागात राहावे, तेथील ग्रामस्थांना आर्थिक मदत करावी, आपले भावनिक नाते निर्माण करावे. आपल्या संपत्तीचा उपयोग ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांसाठी केल्यास ते विद्यार्थी त्या श्रीमंतास आश्रयदाता मानतील. अशा श्रीमंत वृद्धांनी अभिनेता धर्मेंद्रप्रमाणे ग्रामीण भागात शेती घेऊन तिथे लोकांना रोजगार दिल्यास ते ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबातील घटक बनतात. शहरी एकाकीपणाचा लोभ सोडला नाही, तर परवीन बाबीसारखे फ्लॅटमध्ये केव्हा मृत्यू झाला, हे न कळणारा दुःखद अंत होतो.
- मेघा उज्ज्वल म्हस्के,
छत्रपती संभाजीनगर