Jatra Marathi Movie : गेल्या 17 वर्षांत इतकं बदललंय ‘जत्रा’ चित्रपटातील गाव, केदार शिंदे यांनी शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 05:41 PM2022-10-30T17:41:20+5:302022-10-30T17:44:44+5:30
Jatra Marathi Movie : मराठीतले काही चित्रपट आठवले तरी चेहऱ्यावर हसू येतं. असाच एक चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. होय, 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं होतं.
Jatra Marathi Movie : मराठीतले काही चित्रपट आठवले तरी चेहऱ्यावर हसू येतं. असाच एक चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. होय, 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं होतं. चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गं ये ये मैना’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, विजय चव्हाण, कुशल बद्रिके, क्रांती रेडकर अशा दिग्गजांच्या या चित्रपटाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. आता काय तर ‘जत्रा’ या चित्रपटातील गाव चर्चेत आलं आहे. होय, ‘जत्रा’ या चित्रपटात दिसलेलं गाव गेल्या 17 वर्षांत चांगलंच बदललं आहे.
सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये ‘जत्रा’चं शूटींग झालं होतं. अलीकडे ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी त्याच गावाला भेट दिली. मात्र आता ते गाव बरंच बदललं आहे. केदार शिंदे यांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जत्रा’ चित्रपटातील 17 वर्षांपूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव त्यांनी या व्हिडीओत दाखवलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करत केदार शिंदे लिहितात, ‘ 28 ऑक्टोबर 2005 साली जत्रा रिलीज झाला होता. या 28 ला 17 वर्ष झाली त्या दिवसाला. एक तो दिवस आहे आणि एक आजचा. या वर्षांमध्ये जत्राने महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना अगणित वेळा हसवलं आहे. त्याच्या गाण्यांनी कैक कार्यक्रम आणि डी जे पार्टीज रंगवल्या आहेत. कित्येकांच्या आयुष्याचा भाग बनलेला ‘जत्रा’ आमच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेलेलो असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणांना भेट दिली जिथे ‘जत्रा’ शूट झाला होता आणि कित्येक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता सगळं बदललं आहे पण अजून आपली जत्रा तशीच आहे...
तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘जत्रा’चा सीक्वल ‘जत्रा 2’ येत्या काळात आपल्या भेटीस येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केदार शिंदे यांनी ‘जत्रा 2’ची घोषणा केली होती.