कसं झालं जयश्री गडकर यांचं निधन? एकेकाळी अभिनेत्रीने गाजवली होती सिनेसृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:04 PM2023-08-29T13:04:25+5:302023-08-29T13:05:30+5:30
Jayshree gadkar: जयश्री यांचं निधन होऊन जवळपास १५ वर्ष झाली. मात्र, आजही त्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
मराठी सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट सिनेमे देणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर (jayshree gadkar). अवघाची संसार, साधी माणसं, सांगते ऐका आणि थांब लक्ष्मी कुंकू लावते अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमधून जयश्री यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. त्यामुळेच आज मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. जयश्री यांचं निधन होऊन जवळपास १५ वर्ष झाली. मात्र, आजही त्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. म्हणूनच, त्यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय होतं हे जाणून घेऊयात.
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत कौशल्या ही भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जयश्री गडकर यांचा जन्म कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात असलेल्या सदाशिवगड येथे एका कोकणी कुटुंबात झाला होता. सुरुवातीला त्या मीना या नावाने ओळखल्या जायच्या. त्यानंतर जया आणि मग जयश्री अशी त्यांनी ओळख निर्माण केली. जयश्री लहान असतानाच त्यांच्या कुटुंबाने मुंबई गाठली आणि तेव्हापासून त्या इथेच स्थायिक झाल्या.
अशी झाली करिअरची सुरुवात
जयश्री यांना लहानपणापासून नृत्य, अभिनय याची आवड होती. त्यामुळे तमाशा या सिनेमातून बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर १९५५ मध्ये व्ही. शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या सिनेमात त्यांनी काम केलं. पुण्यात एका कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना त्यांचे फोटो राम देवताळे या फोटोग्राफरने काढले आणि तो फोटो त्यांच्या स्टुडिओमध्ये लावला. हा फोटो दिनकर पाटील यांनी पाहिला आणि जयश्री यांना त्यांच्या दिसतं तसं नसतं या सिनेमात काम दिलं. या सिनेमातील त्यांचं नृत्य पाहून दिग्दर्शक राजा परांजपे यांनी जयश्री यांनी खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून त्यांच्या सिनेमात मुख्य भूमिका दिली. त्यानंतर जयश्री यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला.
कसं झालं जयश्री यांचं निधन
जयश्री यांनी अभिनेता बाल धुरी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतरही त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं. जयश्री यांनी मराठीसह हिंदी, तामिळ, पंजाबी आणि गुजराती अशा कितीतरी सिनेमांमध्ये काम केलं. जयश्री यांना सलग ३ वर्ष राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला होता. २००८ साली जयश्री गडकर यांचं निधन झालं. बराच काळ आजारी असल्यामुळे या प्रदीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं.