संगीतातील निखळ आनंद महत्त्वाचा- गायक महेश काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 07:00 AM2019-10-05T07:00:00+5:302019-10-05T12:02:06+5:30
गायक महेश काळे हे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा-स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे’ या सांगितीक कार्यक्रमात परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
अबोली कुलकर्णी
‘सुरत पिया की’, ‘अरूणी किरणी’, ‘मुरलीधर श्याम’ अशा एक ना अनेक सुमधूर गाण्यांद्वारे प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी आपल्या गायनातून रसिकांवर मोहिनी घातली. या गाण्यांची अवीट गोडी दर्दी रसिकांनी अनुभवली. गायक महेश काळे हे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा-स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे’ या सांगितीक कार्यक्रमात परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यानिमित्ताने त्यांच्यासोबत साधलेला हा सुरेल संवाद...
* ‘सूर नवा ध्यास नवा’च्या तिसऱ्या पर्वाचे वैशिष्टय काय आहे?
- वयोगट. आयुष्यातल्या वेगवेगळया टप्प्यांमधलं संगीत अनुभवणं हेच या पर्वाचे वैशिष्ट्य आहे, असे मला वाटते. प्रत्येकाला आयुष्य वेगळया पद्धतीने कळते, प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. आयुष्यातील निरागसता, परिपक्वता यामुळे संगीत वेगळयाप्रकारे उलगडत जातं.
* या तिसऱ्या पर्वातील तुम्हाला आवडणारी गोष्ट कोणती?
- वैविध्य. वेगवेगळया वयातील, स्तरांतील लोकांमधील वैविध्य बघायला मिळत आहे. गाण्यांमधून त्यांचं आयुष्य कशाप्रकारे उलगडत जाते हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.
* स्पर्धकांकडून तुम्ही कशी तयारी करून घेता?
- खरं सांगायचं तर, या पर्वातील सर्व स्पर्धक हे जवळपास तयारी असलेलेच आहेत. बॅकस्टेज तयारी म्हणाल तर, ती मिलिंद जोशी आणि मिथिलेश पाटणकर हे करून घेतात. स्पर्धकांना टेक्निकल गोष्टी समजावून सांगणे, त्यांना दडपण येणार नाही, असे बघणे, ते काय गाणार आहेत, त्यांची तयारी या सगळया गोष्टी ते पाहतात.
* अवधूत आणि स्पृहासोबत तुमचं नातं कसं आहे?
- तुम्ही ऑनस्क्रीन जशी बघता तशीच आमची ऑफस्क्रीन पण केमिस्ट्री आहे. स्पृहा आणि अवधूत दोघांसोबतचे हे तिसरे पर्व आहे. त्यामुळे जशी ओळख वाढत जाईल तशी आमची बाँण्डिंगही वाढत जाणार आहे. शोसाठी आम्ही काही वेगळे करत नाही.
* यंदाच्या पर्वात शाल्मली नसणार, तुम्ही तिला मिस करताय का?
- मी शाल्मलीला खूप मिस करतोय. खरंतर शाल्मली ही खूप चांगली व्यक्ती आहे. तिच्यामध्ये खूप एनर्जी आहे. आमची छान मैत्री पण झालेली आहे. पण, या पर्वांत आम्ही तिला मिस करणार, हे नक्की.
* तुमचं परीक्षण प्रेक्षकांना प्रचंड भावतं, त्याबद्दल काय सांगाल?
- उदाहरणं देऊन समजावून सांगण्याची पद्धत अनेकांना आवडते. पण, मला असं वाटतं की, आपण आयुष्य जगत असताना जे वेचतो तेच आपण देऊ शकतो ना? त्यामुळे मी कायम देण्यामधला आनंद शोधत असतो.
* तुम्ही अनेकांना स्कॉलरशिप, मदत दिली आहे. याबद्दल काय सांगाल?
- निखळ आनंद हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो त्याला मिळालाच पाहिजे. संगीतात जर त्यांचा आनंद सामावलेला असेल तर तो मी त्याला मिळवून देण्यासाठी कमीत कमी प्रयत्न तरी नक्कीच केले पाहिजेत.
* वयाच्या ६व्या वर्षापासून तुम्ही संगीताचे धडे घेतले आहेत, कसे वाटते आता मागे वळून पाहताना?
- मी मागे वळून कधीच पाहत नाही. मी पुढे-पुढे चालत राहतो. पण, हे खरंय की, मागे वळून बघताना खूप सुखकर वाटतं. माझ्या आई-वडिलांनी, अभिषेकी बुवांनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत ते खरे करून दाखवायचे आहेत.
* परदेशातही तुम्ही भारतीय संगीताबद्दल जागृती करता, याबद्दल काय सांगाल?
- जे मला आवडतं ते दुसऱ्यांसोबत मी शेअर करतो. देण्यातला आनंद मला जास्त आवडतो. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यावं म्हणजे त्या ज्ञानात वाढ होते. संगीतातून मिळणारा निखळ आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.