सुयश टिळकच्या बुमरँग या वेबसिरिजला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, जाणून घ्या काय आहे या वेबसिरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:08 PM2019-07-19T17:08:06+5:302019-07-19T17:08:28+5:30
सुयशच्या बुमरँग या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. फिल्मबाझ फिल्मची ही वेबसिरिज प्रेक्षकांना सध्या युट्युबला पाहायला मिळत आहे.
सिनेमामध्ये काम करणारा कलाकार असो किंवा छोटा पडद्यावर अभिनय करणारा कलाकार प्रत्येकाला वेबसीरिजने भुरळ घातलीच आहे. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे ते सुयश टिळकचे. सुयशच्या बुमरँग या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. फिल्मबाझ फिल्मची ही वेबसिरिज प्रेक्षकांना सध्या युट्युबला पाहायला मिळत आहे. ही हॉरर आणि सस्पेन्स बाजाची वेबसिरिज असून या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या नुकताच भेटीस आला असून हा पहिला भाग साडे नऊ हजाराहून अधिक लोकांना आतापर्यंत पाहिला आहे.
बुमरँगमध्ये सुयशसोबतच ओमकार बोरकर, सिद्धेश नागवेकर, शुभम देसाई, मिलिंद जाधव, आनंद शिंदे, सीमा कुलकर्णी, राजेंद्र खेडेकर, पूजा चांदेकर, रक्षदा रणदिवे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरजचे दिग्दर्शन कुणाल राणेने केले असून लेखन अक्षय टेमकरचे आहे. या वेबसिरिजच्या पहिल्या भागामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली असून याचा दुसरा भाग कधी येणार आहे याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
सुशय टिळक हे नाव का रे दुरावा या मालिकेनंतर घराघरात पोहोचले. का रे दुरावा या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. सध्या सुयश एक घर मंतरलेलं मालिकेमध्ये क्षितिज निंबाळकर नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. या मालिकेच्या निमित्ताने सुयश आणि सुरुची पुन्हा एकदा एकत्र आलेत. क्षितिज हा एक नामवंत व्यवसायिक असून त्याला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे.
त्याचबरोबर अतिशय तर्कशुद्ध विचार करणारा आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा असा क्षितिज कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतो. मृत्युंजय हा बंगला कोणीही विकत घ्यायला तयार नसताना केवळ अतिशय किरकोळ किमतीला तो मिळत असल्याने क्षितिज हा बंगला विकत घेतो. या बंगल्यातील अनैसर्गिक गोष्टींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न गार्गी (सुरुची अडारकर) करत आहे.