उपेंद्र लिमये 'ह्या' चित्रपटात साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:48 IST2019-01-28T13:48:04+5:302019-01-28T13:48:44+5:30
सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांमधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात.

उपेंद्र लिमये 'ह्या' चित्रपटात साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक
सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांमधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रत्येक भूमिका आणि त्यानुसार त्याचे उत्कंठावर्धक सादरीकरण यातील उत्तम गणित उपेंद्र लिमयेंना जमले आहे. आजवरच्या त्यांच्या विविध भूमिकांमध्ये आणखी एका चॅलेजिंग पात्राची भर पडली असून लाडे ब्रोज फिल्म्स प्रा.लि. प्रस्तुत 'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात आपल्याला ते एका कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कुठल्याही क्षेत्रात दिशादर्शकाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. शिक्षक-प्रशिक्षकांची दूरदृष्टी आणि स्वानुभव मुलांना केवळ योग्य ती दिशाच नाही तर त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देण्याचे काम करते. अशाच एका कुशल सारथीची भूमिका 'सूर सपाटा'च्या निमित्ताने उपेंद्र लिमये साकारत आहेत. गावखेड्यातील आपल्या मातीतला खेळ म्हणजेच कबड्डीच्या अनुषंगाने या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून त्याचे दिग्दर्शन मंगेश कंठाळे यांनी केले आहे तर अभिनय जगताप यांचे सुमधूर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. शाळेतल्या टवाळ मुलांमधील कौशल्य जाणून त्यांना कबड्डी खेळासाठी प्रवृत्त करताना, कधी काट्यावर धरणारे कडक प्रशिक्षक तर कधी मुलांच्या बाजूने उभे राहणार्या प्रेमळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत उपेंद्र लिमये आपल्याला दिसणार आहेत. हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे यांसारख्या तिकडंबाज अभिनेत्यांचा सूर तपासण्यासाठी उपेंद्र लिमये सज्ज झाले असून २२ मार्चला या होतकरू कबड्डीपटू आणि प्रशिक्षक यांच्यातील 'सूर सपाटा' पाहणे रंजक ठरेल. शिवाय किमान २५ दिग्गज कलाकारांचा ताफा या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार असून त्यांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत.
जयंत लाडे निर्मित, किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा' या चित्रपटाच्या निमित्ताने ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंसोबतचा हा रोमांचकारी खेळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवणारा आहे. 'सूर सपाटा'ची वेगवान कथा मंगेश कंठाळे यांची तर पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांनी लिहीली आहे. संवादलेखनही अमित बैचे यांनीच केले आहे तर छायांकन विजय मिश्रा यांचे आहे.