'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटात के के मेनन सोबत झळकणार ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 06:15 IST2018-10-09T14:02:27+5:302018-10-10T06:15:00+5:30
के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटात के के मेनन सोबत झळकणार ही अभिनेत्री
के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. द गाझी अटॅक, हैदर, लाइफ इन मेट्रो यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याची जोडी राजेश्वरी सचदेवसोबत झळकणार आहे. राजेश्वरीने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच हिंदी मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे. राजेश्वरी आणि के. के यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे नाव 'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' असे असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते करत आहे. त्याने आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. खुलता कळी खुलेना, जुळून येती रेशीम गाठी, आभास हा, लज्जा, कुलवधू, वादळवाट, अग्निशिखा, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. मुंगळा, प्रेमसूत्र, डावपेच, डॅम्बिस, प्रतिबिंब, उलाढाल या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. त्याने सोनाक्षी सिन्हाच्या अकिरामध्ये देखील खूप चांगली भूमिका साकारली होती.
देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या एक सांगायचंय.... UNSAID HARMONY या चित्रपटात बॉलिवूडमधील दमदार अभिनेता के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव ही जोडी पहिल्यांदाच मराठीत एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत हिंदीतील दिग्गज कलाकार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.
'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटात नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पुष्पांक गावडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे. शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांनी वेशभूषाकार म्हणून या चित्रपटासाठी काम पाहिले आहे तर ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीने चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.
येत्या १६ नोव्हेंबरला 'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.