'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 05:53 PM2022-03-08T17:53:17+5:302022-03-08T17:53:55+5:30

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Kedar Shinde's 'Baipan Bhari Deva!' movie poster out | 'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत

'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत

googlenewsNext

प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या चित्रपटाची आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वैशिष्ठ्यपूर्ण पोस्टरने घोषणा करण्यात आली आहे. हे पोस्टर खूप चर्चेत आले आहे. या पोस्टरवरील 'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?' या टॅगलाइनला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर आज जिओ स्टुडिओज् आपला दुसरा आणि अत्यंत वेगळा बाज असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. तसंच एमव्हीबी मीडिया यांची निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट असून माधुरी भोसले यांनी याची निर्मिती केली आहे. त्यांना बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे.  आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घटना, एखादा संवेदनशील विषय, सामान्य माणसांचे प्रश्न अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने मांडण्याची ताकद केदार शिंदे यांच्या चित्रपटात असते. 

चित्रपटाच्या या घोषणेनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तृत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे.” जिओ स्टुडिओज् प्रस्तुत माधुरी भोसले निर्मित ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा लोकप्रिय महिला कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Kedar Shinde's 'Baipan Bhari Deva!' movie poster out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.