'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 08:48 AM2023-08-02T08:48:13+5:302023-08-02T08:48:53+5:30

Kiran mane: या अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे.

kiran-mane-share-memories-vandana-gupte-marathi-actress crush | 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). 'मुलगी झाली हो', 'बिग बॉस मराठी' अशा गाजलेल्या कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. किरण माने अभिनयासह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. बऱ्याचदा ते कलाविश्वातील त्यांचे अनुभव शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या क्रश असलेल्या अभिनेत्रीविषयी भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीविषयी सांगितलं.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यामुळे ते सतत काही ना काही पोस्ट करत असतात. यात त्यांनी अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी वंदना गुप्ते त्यांच्या पहिलं क्रश होत्या असं म्हटलं आहे. सोबतच त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

...कॉलेजमध्ये असताना जिचा मी 'फॅन' होतो.. जिच्यावर अक्षरश: 'क्रश' होता.. जिच्या आवाजाचा मी दिवाना होतो.. पुढं जाऊन त्याच अभिनेत्रीचा मी हिरो म्हणून प्रमुख भुमिका मला करणारंय, असं कुणी सांगीतलं असतं, तर मी त्याला येड्यात काढलं असतं !
रिहर्सल करताना स्वत:वर विश्वासच बसत नव्हता...'चारचौघी'मधल्या तिच्या 'फोन सीन'साठी कितीतरी वेळा ते नाटक पाहिलंवतं मी. ज्याचा त्याचा प्रश्न-संध्याछाया-सेलिब्रेशन.. प्रत्येक नाटक फक्त तिच्यासाठी पाहिलं.. 'कट टू' - तिच्या शेजारी उभा राहून मी लव्ह सीन करत होतो, गाणी म्हणत होतो. आईशप्पत ! विश्वासच बसत नव्हता स्वत:वर...

...बारा वर्षांपुर्वीची ही गोष्ट ! सातार्‍यात घरी होतो. फोन वाजला. स्क्रीनवर नांव आलं 'प्रशांत दामले'. "किरण, मी 'श्री तशी सौ' नाटक पुनरुज्जीवीत करतोय. तू काम करशील का? सोबत वंदना गुप्ते आहे." पुर्वी मोहन जोशी,गिरीश ओक आणि वंदना गुप्तेंनी हे नाटक केलेले मी पाहिलंवतं. मला वाटलं मी मोहन जोशींनी साकारलेला सुत्रधार करणार. 'श्री-सौ' जोडगोळी प्रशांत-वंदना असणार असं वाटलं. जेव्हा मला समजलं की मला 'श्री' च्या भुमिकेसाठी विचारलं गेलंय आणि माझ्या 'सौ' असणार आहेत वंदना गुप्ते.. तेव्हा मी उडालोच ! सुत्रधाराची भुमिका करणार होते प्रशांत दामले... सोबत होते अक्षय पेंडसे आणि अक्षता बिवलकर... नाटक म्हणजे धुमाकुळ होता नुस्ता... फुल्ल ऑन कॉमेडी. धमाल गाणी-भन्नाट डान्स... राडा-धिंगाणा-दणका होता.. तालमीतच लै मज्जा आली.
पहिला प्रयोग सुरू होताना कधी नव्हे ते लै लै लै टेन्शन आलंवतं. वंदना गुप्तेंचा हिरो म्हणून मला स्विकारतील का लोक?? सगळं फसलं तर??? बेक्कार हालत झालीवती... पण पहिला प्रयोगच दणक्यात पार पडला. या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं...'सुपरस्टार' प्रशांत दामलेंचा रंगभूमीवरचा करीश्मा जवळनं अनुभवला. इथंच नाय, तर इंग्लंड मध्ये लंडन-हॉन्सलो-इलफर्ड-बर्मिंगहॅम पासून थेट स्कॉटलंड पर्यंत या नाटकाचे अनेक प्रयोग जबराट वाजले... हाऊसफुल्ल झाले !

काल ३१ जुलैला या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तब्बल बारा वर्ष झाली... फेसबुकनं अलगद वर काढली, एक तपापूर्वीची गोड स्वप्न अनपेक्षितपणे सत्यात उतरवणारी ही हवीहवीशी आठवण !

दरम्यान, किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. लवकरच ते एका नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार आहेत. तर, वंदना गुप्ते यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. वंदना गुप्ते यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटकं यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. 
 

Web Title: kiran-mane-share-memories-vandana-gupte-marathi-actress crush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.