“न झुकता पाठीचा कणा…”; किरण मानेंची बॉलीवूड किंग शाहरुख खानसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 17:43 IST2023-09-23T17:40:38+5:302023-09-23T17:43:51+5:30
किरण माने यांनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला.

Kiran Mane
बॉलिवूडचा बादशाह म्हणुन ओळख असलेला शाहरुख खान याने पुन्हा बॉलिवूडवरील त्याच वर्चस्व सिद्ध केलं. त्याच्या 'जवान'ने अनेक रेकॉर्ड तोडले. 'जवान' रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये शाहरुखच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. काही ठिकाणी चाहते थिएटरमध्ये नाचत आहेत. शाहरुखच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. त्यात मराठी सेलिब्रेटीसुद्धा आहेत. अनेकजण शाहरुख खान वरील प्रेम आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत असतात. नुकतेच बिग बॉस मराठी फेम किरण माने यांनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी आपल्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, "न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं... त्यानं जग जिंकलं ! परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला, ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, 'सलाम' करतो... आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक 'प्युरीफायर' आहेत. लब्यू SRK". या पोस्टमधून किरण माने यांनी अप्रत्यक्षपणे विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खान विरोधात भाष्य केले होते.
‘जवान’ ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
तर अभिनेते किरण माने हे बिग बॉस मराठी शोमधून प्रकाशझोतात आले होते. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे किरण माने कायम चर्चेत असतात. ते कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतात. किरण माने किंग खानचे चाहते आहेत. जवान चित्रपट पदर्शित झाल्यापासून त्यांनी शाहरुख आणि चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट केल्या आहेत.