आता रोमँटिक कविता का सुचत नाहीत? किशोर कदम म्हणाले, "तो गारवा होता पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:02 IST2025-03-08T15:01:09+5:302025-03-08T15:02:06+5:30
'गारवा' सारखा अल्बम पुन्हा होईल का?

आता रोमँटिक कविता का सुचत नाहीत? किशोर कदम म्हणाले, "तो गारवा होता पण..."
कवी, अभिनेते किशोर कदम (Kishore Kadam) ऊर्फ सौमित्र म्हटलं की 'गारवा' आठवतो. त्यांचा 'गारवा' हा रोमँटिक अल्बम खूप गाजला होता. प्रेम, विरह या विषयांवर त्यांनी अनेक कविता केल्या ज्यांनी सगळ्यांच्याच मनात घर केलं. मात्र आता किशोर कदम फारशा रोमँटिक कविता लिहीत नाहीत. याचं कारण त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
किशोर कदम यांनी नुकतीच 'कॅचअप' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, "तो जो गारवा होता ना..पहिला पाऊस, पहिली आठवण..ते तारुण्य होतं. त्या शब्दांचं, त्या वयाचं कौमार्य होतं. आता पाऊस मॅच्युअर झालाय. आता तो पावसात भिजतो, त्याला प्रेम आठवतं पण तो तिला भिज, चाल, खिडकीत उभी राहा, बघ माझी आठवत येते का? असं म्हणत नाही. कारण त्याला माहितीये की नाही येत. त्याला माहितीये की ती आता विसरली असणार. किंवा त्याला माहितीये की तिच्या मनामध्ये कुठेतरी असणार परंतू आता तीही वेगळ्या वाटेने पुढे निघून गेली असणार आणि मीही खूप वेगळ्या ठिकाणी निघून आलोय!"
किशोर कदम नुकतेच 'मानवत मर्डर्स' वेबसीरिजमध्ये दिसले. त्यांनी अनेक कविता रचल्या आहेत. 'गारवा' अल्बम १९९८ साली प्रदर्शित झाला होता. त्याला आता २५ वर्ष झाली आहेत. किशोर कदम यांनी ही गाणी लिहिली होती तर मिलिंद इंगळेंनी संगीत दिलं होतं. तसंच गायलंही होतं. आजही अनेकांच्या मनात 'गारवा' जिवंत आहे.