‘चांदणे शिंपीत जा’ या चित्रपटातील ‘ही’ चिमुरडी आठवते? पुढे ती दिग्गज नेपाळी अभिनेत्री बनली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 08:00 AM2021-10-02T08:00:00+5:302021-10-02T08:00:07+5:30

‘हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली’ या सुमधूर गाण्यातील बालकलाकार आठवते?  

know about Chandane Shimpit Ja marathi film child artist tripti nadkar performed in more than a dozen Nepali films | ‘चांदणे शिंपीत जा’ या चित्रपटातील ‘ही’ चिमुरडी आठवते? पुढे ती दिग्गज नेपाळी अभिनेत्री बनली...!

‘चांदणे शिंपीत जा’ या चित्रपटातील ‘ही’ चिमुरडी आठवते? पुढे ती दिग्गज नेपाळी अभिनेत्री बनली...!

googlenewsNext
ठळक मुद्देमुलं मोठी झाल्यावर  तृप्तीने अनेक वर्षांनी कमबॅक केले. आमको काख, कुसुमे रुमाल २, कोही मेरो अशा काही नेपाळी चित्रपटात ती दिसली.

‘हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली’ हे ‘चांदणे शिंपित जा’ (Chandane Shimpit Ja )या मराठी चित्रपटातील सुमधूर गाणं आजही मनाचं ठाव घेतं. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गाण्यातील बालकलाकार आठवते?  
होय, 1982 साली प्रदर्शित झालेल्या  आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा नाईक,  अशा अनेक मातब्बर कलाकारांसोबत एका चिमुकलीचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होती. हे गाणं तिच्यावरचं चित्रीत झालं होतं. तिचं नाव तृप्ती नाडकर (Tripti Nadakar). पुढे  महेश कोठारे यांची नायिका म्हणून ‘घरचा भेदी’ या मराठी चित्रपटात ही तृप्ती दिसली होती. आता ही तृप्ती कुठे आहे? काय करते? हे जाणून घेण्यास तुम्ही नक्कीच उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.


 
तर तृप्तीचा जन्म दार्जिलिंगचा. तिची आई मायादेवी या एक स्थानिक प्रसिद्ध गायिका होती.  वयाच्या अवघ्या आठव्या वषार्पासूनच तृप्तीने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने नेपाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.  मराठी कुटुंबात जन्मलेली असल्याने तृप्तीला मराठी भाषा चांगलीच अवगत होती. अभिनयाचं अंग होतं. या जोरावर  चांदणे शिंपित जा, घरचा भेदी अशा मराठी चित्रपटात अभिनयाची संधी तिला मिळाली. पुढे ‘गोदाम’ या हिंदी सिनेमातही ती झळकली. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. गुजराती सिनेमांतही तिने काम केलं. गुजराती, हिंदी चित्रपट साकारत असताना तिला नेपाळी चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.

होय, तृप्तीचे काका तुलसी घिमिरे दिग्दर्शक होते. त्यांनी तिला नेपाळी चित्रपटात प्रमुख नायिका साकारण्याची संधी दिली आणि वयाच्या 15 व्या वर्षी ‘कुसुमे रुमाल’ या नेपाळी सिनेमात ती झळकली. तिचा हा पहिलावहिला नेपाळी सिनेमा तुफान गाजला आणि  बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेली तृप्ती बघता बघता दिग्गज नेपाळी नायिकांच्या यादीत जाऊन विराजमान झाली. त्याकाळी तृप्तीचा इतका दबदबा होता की, एका चित्रपटासाठी ती तब्बल दीड लाख मानधन घ्यायची. 
 तृप्तीला नेपाळी भाषा येत नव्हती. त्यामुळे या चित्रपटात तिचे डायलॉग डबिंग केले जात. पण तरिही तिच्या चित्रपटांवर नेपाळी प्रेक्षकांच्या उड्या पडत.

करिअर ऐन बहरात असताना तृप्तीने मुंबई स्थित इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस असलेल्या व्यवसायिकाशी  संसार थाटला आणि 1988 च्या सुमारास अभिनय क्षेत्रातून संन्यास घेण्याचा निर्णय  घेतला. नवरा आणि मुलांना वेळ देता यावा यासाठी तिने करिअरवर पाणी सोडले. तृप्तीचा थोरला मुलगा हा मुंबईत  तिने सुरू केलेला ‘तृप्तीज् डान्स क्लास’ चालवत असून तिचा धाकटा मुलगा जाहिरात आणि टेलिव्हिजन मालिका क्षेत्रात कार्यरत आहे. 

मुलं मोठी झाल्यावर  तृप्तीने अनेक वर्षांनी कमबॅक केले. आमको काख, कुसुमे रुमाल २, कोही मेरो अशा काही नेपाळी चित्रपटात ती दिसली. आज एक नेपाळी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. पण म्हणून मराठीतील तिचे योगदानही विसरता येणार नाही. ‘चांदणे फुलांनी हे’ गीत तर चाहते कधीच विसरू शकणार नाहीत.

Web Title: know about Chandane Shimpit Ja marathi film child artist tripti nadkar performed in more than a dozen Nepali films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.