'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 07:57 PM2018-12-12T19:57:24+5:302018-12-12T19:57:24+5:30
कोकण चषक २०१८ या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने कोकण चषक २०१८ या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई,ठाणे,रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी या जिल्ह्यातून नऊ टीम सहभागी झाल्या होत्या.
ही स्पर्धा नुकतीच दादर येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे अंतिम परीक्षक अनिता दाते, भारती पाटील, अभिनेता अनिल गवस, समीर खांडेकर आणि माधव देवचक्के हे कलाकार होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.
कोकण चषक २०१८ या स्पर्धेत मुंबईच्या रुईया कॉलेज च्या 'एकादशावतार' या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट पार्श्र्वसंगीत असे तब्बल ५ पुरस्कार पटकावले. तर रेनबोवाला, तुरटी हि नाटक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजेता ठरली. तर उत्तेजनार्थ म्हणून फायनडींग खड्डा ही एकांकिका निवडली गेली. ही संपूर्ण एकांकिका स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मंदार टिल्लू, बाप्पा राऊत, हर्षला लिखिते यांनी मेहनत घेतली.
महाराष्ट्राच्या विविध भागापुरते मर्यादित असलेले अभिनय कौशल्य हे अशा एकांकिका स्पर्धांमुळे सर्वासमोर येते. त्याचमुळे अशा स्पर्धाना सर्वानी प्रोत्साहित करून त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत अभिनेता अनिल गवस यांनी व्यक्त केले.
याच स्पर्धांमुळे येणाऱ्या काळात लवकरच मराठी रंगभूभी,मालिका,चित्रपट यामध्ये नवनवीन चेहेरे आपल्याला पाहायला मिळतील आणि आम्हालाही त्याच्या सोबत काम करायची संधी मिळेल, असे अभिनेत्री भारती पाटील म्हणाल्या.