'क्षणभर विश्रांती'ला झाली ९ वर्ष पूर्ण, सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 03:58 PM2019-04-13T15:58:32+5:302019-04-13T15:59:11+5:30
'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत.
'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सिद्धार्थ जाधवने इंस्टाग्राम अकाउंटवर 'क्षणभर विश्रांती' चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले कलाकार दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून सिद्धू म्हणाला की, ''क्षणभर विश्रांती'ची नऊ वर्षे साजरी करत आहोत.' सिद्धार्थच्या या पोस्टमुळे या सिनेमाच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
सचित पाटील लिखित व दिग्दर्शित 'क्षणभर विश्रांती' चित्रपटात मैत्रीची गुंफण आणि त्यात खुलत जाणारे हळुवार प्रेम हे सगळे अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने रेखाटण्यात आले आहे. यात सचित पाटील, हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, मौलिक भट्ट, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, कादंबरी कदम, पूजा सावंत आणि भरत जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. पूजा सावंतचा हा पहिलाच चित्रपट होता.
याशिवाय सिद्धार्थने त्याच्या या सिनेमासोबत अजून एका त्याच्या गाजलेल्या सिनेमा 'लालबाग परळ'ची आठवण पण शेअर केली आहे. या चित्रपटाला देखील यंदा 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळाली होती.