"ज्याचा विचारसुद्धा करत नाही, देव तसंच काहीतरी...", सिद्धार्थ जाधवबरोबरचा फोटो शेअर करत कुशलची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:27 AM2024-10-24T11:27:33+5:302024-10-24T11:27:57+5:30
नुकतंच सिद्धार्थचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.
कुशल बद्रिके आणि सिद्धार्थ जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. या दोघांनीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचं शिखर गाठलं. उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर कुशल आणि सिद्धार्थने कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं. अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र काम करताना दिसली. अभिनेते असण्याबरोबरच सिद्धार्थ आणि कुशल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकतंच सिद्धार्थचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.
सिद्धार्थच्या वाढिवशी कुशलने त्यांचा ज्यूस पितानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कुशलने सिद्धार्थसाठी खास पोस्टही लिहिली आहे. "एकपात्री अभिनय स्पर्धेत accidentally भेटलेले आपण पुढे आयुष्याचा एकत्र प्रवास करू ! असं मात्र कधी वाटलं नव्हतं , नाटक, मालिका आणि सिनेमांमधे एकमेकांची वाक्य वाटून घेताना आपण कधीतरी एकमेकांच्या आयुष्यातली सुख-दुःख वाटून घेऊ असही कधी वाटलं नव्हतं", असं कुशलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "पण आपण ज्याचा विचार सुद्धा करत नाही, “देव” तसलंच काहीतरी नशिबात लिहून ठेवतो आणि म्हणूनच तर जगण्याला गंमत आहे. नाहीतर रटाळ झालं असतं यार अख्खं life...देव तुला खूप आनंद आणि शांत झोप देवो. ह्याच माझ्या शुभेच्छा तुला happy birthday मित्रा!!". कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, माझा नवरा तुझी बायको, हुप्पा हुय्या या सिनेमांमध्ये कुशल बद्रिके आणि सिद्धार्थ जाधव एकत्र दिसले. त्यांच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगला प्रेक्षकांकडूनही दाद मिळाली.