'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू झळकणार रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 04:12 PM2020-12-17T16:12:05+5:302020-12-17T16:12:34+5:30
'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडूची भूमिका साकारणारा राजवीरसिंग राजे गायकवाड आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातील लाडूने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली. लाडूची भूमिका साकारणारा राजवीरसिंग राजे गायकवाड आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
'अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च:' अशी टॅगलाईन असलेल्या 'भारत माझा देश आहे'. या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर झळकल्यानंतर आता चित्रपटातील कलाकारही प्रेक्षकांसमोर आले आहेत. खरं तर टिझर पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात कोण असणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि अखेर याचे उत्तर मिळाले आहे. मालिकेतील 'लाडू' या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. एकंदरच तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट देशभक्तीवर आधारीत असल्याचा अंदाज आपण टिझर पोस्टरवरून लावूच शकतो.
एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित 'भारत माझा देश आहे'ची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे असून संगीत अश्विन श्रीनिवास यांचे आहे. तर समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांचे आहे.