'कागर' सिनेमातील 'लागलीया गोडी तुझी' गाणं तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 11:31 AM2019-04-06T11:31:57+5:302019-04-06T11:35:09+5:30
'लागलीया गोडी तुझी' हे एक प्रेमगीत असून या गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी केले आहे.
नुकताच 'कागर' चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीत या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा गुंफण्यात आल्याचे जाणवते.टीझर पाठोपाठ सिनेमाचं पहिलं गाणं 'लागलीया गोडी तुझी' हे प्रदर्शित झालं आहे. 'लागलीया गोडी तुझी' हे एक प्रेमगीत असून या गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी केले आहे. तसेच शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी या गाण्याचे गायन केले आहे. गाण्यातील संगीत आणि चाल लक्षात घेता हे गाणे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर लवकरच प्रसिद्धीस येईल यामध्ये तीळमात्र शंका नाही.
दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर रिंकुचा चित्रपट येत असल्याने कागर विषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कागर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधीर कोलते यांनी स्पष्ट केलं होतं.
'कागर' ही एक प्रेम कथा आहे जी राजकारणाशी गुंफलेली आहे. 'सुधीर कोलते' आणि 'विकास हांडे' यांच्या' उदाहरणार्थ' या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.तसेच दिग्दर्शक' मकरंद माने' यांनी कागर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अत्यंत अल्पशा काळामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेला चित्रपटाचा टिझर आणि अत्यंत सुरेख असे चित्रपटाचं पहिलं गाणं यामुळे कागर बद्दल रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.