'लक्ष्या अस्ताला जात होता, पण....', शेवटच्या तीन दिवसात अशी होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:33 AM2023-04-25T11:33:03+5:302023-04-25T11:33:41+5:30
Laxmikant Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे दिवस कसे होते हे प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांनी सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. याशिवाय आपल्या स्वभावाने जीवाभावाची माणसंही कमावली. आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहेत. त्यांचे जाणे सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेले. मात्र त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही प्रेक्षकांना ठाऊक नाहीत. लक्ष्मीकांत यांचे जवळचे मित्र विजय पाटकर, विजय कदम आणि जयवंत वाडकर यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांच्या आठवणींना उजाळा दिला होता. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली होती.
अभिनेते विजय पाटकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले होते की, 'नवरा माझा नवसाचा चित्रपटाचे शुटींग पूर्ण करून मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही त्याला भेटायला गेलो. तेव्हा लक्ष्मीकांतला फारसे काही आठवत नव्हते. पण आम्हा दोघांना पाहून तो म्हणाला, 'बघा दोन डाकू आले.' ५-१० मिनिटे आम्ही त्याच्या बाजूला बसलो आणि नंतर निघालो. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० च्या सुमारास मला विजय कदमचा फोन आला. तो म्हणाला, 'पाटू चल लवकर.. लक्ष्या गेला.' त्यानंतर धावत आम्ही गेलो.'
जयवंत वाडकर यांनीही आपल्या जवळच्या मित्राच्या आठवणीला उजाळा देताना म्हटले की, 'मला आठवतंय त्याला घरी नेले होते तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा तो फक्त दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. लक्ष्या म्हणाला की मला आत घेऊन चल. तसे मी त्याला पकडून आत घेऊन जात असताना तो मला म्हणाला, मी असणार आहे. मी शेवटपर्यंत बरोबर असणार. हे त्याचे शेवटचे बोलणे होते. यानंतर आम्ही घरी आलो आणि पहाटे मला लक्ष्या गेल्याचे कळले. मी, विजय कदम, विजय पाटकर आणि विनय येडेकर आम्ही चौघे अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्याजवळ होतो. आम्हाला प्रत्येकालाच त्याची फार आठवण येते. सांगायला अजिबात लाज वाटणार नाही की, मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना जगवणारा आणि मोठे करणारा तो एक होता. त्या काळात प्रत्येकाची नाईट वाढवणे, पैसे वाढवणे हे त्याने त्या काळात सुरू केले आणि लोक आज त्याला फॉलो करत आहेत.'
विजय कदम म्हणाले की, '१९७८ पासूनची आमची मैत्री. चिसौका नाटकात घेतले, संगीत सुकामेवामध्ये तर सगळे विनोदी कलाकार एकत्र केले आणि एक वर्षी एका गणेशोत्सवात नऊ दिवसांमध्ये आम्ही ११ प्रयोग केले. त्यात आम्ही दोघेच निर्माते, दोघेच काम करणारे. अभिनेता, निर्मात्यापेक्षा तो मित्र म्हणून खूप जास्त खास होता. त्याचे लग्न आधी झाले मग काही वर्षांनी माझे झाले. एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर त्याने मला गाडीत घेऊन स्वतःहून विचारले, 'गुंतवणूकीचं काही केलं का?' मग दुसऱ्या दिवशी त्याचा इनवेस्टमेन्टवाला माणूस माझ्या घरी यायचा आणि सांगायचा की मला बेर्डे सरांनी पाठवले आहे. इतके मित्राबद्दलचे प्रेम फार क्वचित पाहायला मिळते. शेवटच्या त्या तीन दिवसांमध्ये माझ्या घरापासून २ मिनिटांवर रुग्णालय होते. प्रिया इतर गडबडीत असल्यामुळे तिने मला सांगितलेले की लक्ष्मीकांतसाठी दहीभाताचा डबा घेऊन जायला.'
ते पुढे म्हणाले की, 'त्या तीन दिवसांमध्ये जेव्हा मी तो अस्ताला जाणारा लक्ष्या पाहत होतो तेव्हा आतल्या आत कुढत होतो. पण मी एक गोष्ट शेवटपर्यंत राखली होती ती म्हणजे 'तू हे करू नकोस' असं मी त्याला कधीच बोललो नाही. कारण हे ज्यांनी ज्यांनी त्याला सांगितले त्या प्रत्येकाशी त्याने अबोला धरला. फक्त एक मी असा होतो त्याला मी हे काही बोललो नाही. आज मला स्वतःला बरे वाटते की मी त्याला कुठे दुखावले नाही.'