आता रंगभूमीवर ‘लक्षातला लक्ष्या’, उलगडणार लक्ष्याचा जीवनप्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:23 PM2018-12-28T16:23:46+5:302018-12-28T16:24:03+5:30
रसिकांना त्याने खळखळून हसवलं, रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा, कॉमेडीच्या ...
रसिकांना त्याने खळखळून हसवलं, रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा, कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने त्याने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे साऱ्यांचा लाडका 'लक्ष्या'. लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेने आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं, त्यांचं मनोरंजन केलं. मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. लक्ष्या आपल्यात नसला तरी त्याने गाजवलेल्या भूमिकाममधून तो आपल्यातच असल्याचे प्रत्येकालाच वाटतं. इतक्या वर्षांनंतरही लक्ष्याची जादू कमी झाली नसल्याचे पाहायला मिळतं. त्यामुळंच की काय आता लक्ष्याचा जीवनप्रवास रंगभूमीच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडणार आहे. शालेय जीवनापासून सुपरस्टार पदापर्यंतचा लक्ष्याचा यशस्वी प्रवास रंगभूमीच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. ‘लक्षातला लक्ष्या' या नाटकाद्वारे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे चाहत्यांना पुन्हा एकदा रंगमंचावर अनुभवायला मिळणार आहे. पुरूषोत्तम बेर्डे या नाटकाची निर्मिती आणि लेखनाची धुरा सांभाळणार आहेत. या नाटकाच्या दिग्दर्शनाचं शिवधनुष्य विजय केंकरे हे पेलणार आहेत. पुरूषोत्तम बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातला संवाद एका हटके पद्धतीने यातून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे या नाटकाच्या निमित्ताने रसिकांच्या मनात त्यांच्या लाडक्या लक्ष्याच्या आठवणी दाटून येतील यांत शंका नाही.