अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:20 PM2024-08-13T15:20:40+5:302024-08-13T15:21:29+5:30

Anuradha Paudwal : सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. यात प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे.

Lata Mangeshkar 2024 Award announced to Anuradha Paudwal | अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना लता मंगेशकर पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासोबतच  नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. संगीत आणि गायन क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना घोषित करण्यात आला आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरवचा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. 

राज्य सांस्कृतिक पुरस्कार

सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ ची ही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक या विभागासाठी २०२४ चा पुरस्कार विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये २०२४चा पुरस्कार डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील २०२४ चा पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना जाहीर झाला असून शाहीरी क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील  २०२४ साठी सोनिया परचुरे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी २०२४ चा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार  संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील २०२४ साठी पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात २०२४ साठी नागेश सुर्वे (ऋषीराज) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील २०२४ चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत यांना घोषित झाला आहे तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये  २०२४ साठी शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रूपये १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, मानचिन्ह व मानपत्र होते, तर आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लक्ष रोख, मानपत्र व मानचिन्ह असे  झाले आहे. 

Web Title: Lata Mangeshkar 2024 Award announced to Anuradha Paudwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.