Hridaynath Mangeshkar Hospitalized: ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:49 PM2022-04-25T12:49:18+5:302022-04-25T12:50:29+5:30
Hridaynath Mangeshkar Hospitalized: हृदयनाथ यांना रूग्णालयात भरती करण्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तथापि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Hridaynath Mangeshkar Hospitalized: दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे धाकटे बंधू आणि ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 84 वर्षांच्या हृदयनाथ यांची प्रकृती बरी नसल्याची बाब समोर आली आहे. यानंतर आता त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
हृदयनाथ यांना रूग्णालयात भरती करण्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तथापि त्यांची प्रकृती स्थिर असून येत्या 10-12 दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती त्यांचे चिरंजीव आदिनाथ यांनी दिली आाहे.
काल रविवारी माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला संबोदित करताना आदिनाथ यांनी हृदयनाथ यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून माझे वडील पं. हृदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमाचं बीजभाषत देतात. पण यावर्षी ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. कारण त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परमेश्वराच्या कृपेने ते येत्या 10-12 दिवसांत घरी परततील,’असं आदिनाथ म्हणाले.
पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मोदींनी हा पुरस्कार जनतेला समर्पित केला. आपल्या भाषणात त्यांनी पं.हृदयनाथ हे लवकरात लवकर बरे होवोत, अशा सदिच्छाही दिल्यात.
हृदयनाथ मंगेशकर यांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांचा थोर वारसा जतन करीत आपली वाटचाल १९५५ पासून आपल्या संगीताची कारकीर्द सुरू केली. अनेक कवींच्या गाण्यांना त्यांनी सुंदर चाली दिल्या.