महिलांचा आदर न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी, #MeToo वादळावर लतादीदींनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:10 PM2018-10-15T21:10:24+5:302018-10-15T21:11:33+5:30
चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर लतादीदींच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे.
महिलांचा मान-सन्मान आणि आदर व्हायलाच हवा अशी भूमिका गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी मांडली आहे. #MeToo या मोहिमेची सध्या जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे. नोकरीनिमित्त अनेक महिला घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी त्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं आणि त्यांचा मान सन्मान आदर राखला गेलाच पाहिजे. हा त्यांचा अधिकार असल्याचेही लतादीदींनी नमूद केले आहे. बहिण मीना यांच्या 'मोठी तिची सावली' या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान #MeTooबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लतादीदींनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आदर, मान-सन्मान मिळायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र त्यांचे अधिकार, पद, प्रतिष्ठा कुणी नाकारत असल्यास त्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी स्पष्ट आणि परखड मत दीदींनी व्यक्त केले आहे. शिवाय आपल्यासोबत एखाद्याने वाईट व्यवहार केला तर तो वाचणार नाही असं लतादीदींनी म्हटलं आहे. सध्या देशभरात #MeToo चं वादळ घोंगावतंय. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर लतादीदींच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे.
'मोठी तिची सावली'बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, 'माझ्या बहिणीशिवाय मला कोण जास्त ओळखेल? माझ्या जन्मापासूनच ती माझ्या आयुष्याचा भाग राहिली आहे असंही दीदींनी नमूद केलंय. गीतकार नखशाब जार्चवी यांना लता मंगेशकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा या पुस्तकात उल्लेख आलाय. मात्र असं ही घडलं नव्हतं असं दीदींनी सांगितलं. ते त्यांच्या आणि आपल्याबाबत अफवा पसरवत होते आणि त्यात काहीच तथ्य नव्हतं असंही त्यांनी सांगितलं. तरुणपणात आपण थोडं रागीट होतो मात्र आपल्याशी पंगा घेणारा कधीच वाचू शकत नव्हता असंही दीदींनी हसतहसत सांगितलं.
शिवाय आपल्यावर आलेल्या पुस्तकांच्या लेखकांनी परवानगी घेतली नसल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यातील काही पुस्तकं अपमानजनक आहेत. अशा लेखकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बॉलिवूडमधील महान लोकांची आत्मचरित्र खूपच कमी आहेत. त्यामुळे कुंदनलाल सहगल, दिलीप कुमार आणि पंडित दीनानाथ मंगेशकर यांची आत्मचरित्र यावीत अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. मीना कुमारी, हेमा मालिनी यांचा फोटो काढायला आवडेल असंही दीदींनी यावेळी सांगितलं.