लॉकडाऊनमध्ये लावणीसम्राज्ञी माया जाधव यांचे होतायेत हाल, मदत मिळणे देखील झाले आहे मुश्कील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:57 PM2020-05-26T12:57:48+5:302020-05-26T13:00:07+5:30
माया जाधव या सध्या पनवेलमधील त्यांच्या घरी असून त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि या दोघांनी पाळलेल्या १५ मांजरी देखील आहेत.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नाहीये. तसेच कोणत्याही नाटकांचे प्रयोग, लावणीचे कार्यक्रम होत नाहीयेत. त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वृद्ध कलाकारांना तर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी देखील घराच्या बाहेर पडता येत नाहीये.
लावणीसम्राज्ञी माया जाधव या सध्या पनवेल येथील त्यांच्या घरात असून त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. माया जाधव या लोककलाकार असण्यासोबतच त्यांनी पिंजरा, चांडाळ चौकडी, लक्ष्मीची पाऊलं, बंदीवान मी या संसारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
माया जाधव या सध्या पनवेलमधील त्यांच्या घरी असून त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि या दोघांनी पाळलेल्या १५ मांजरी देखील आहेत. माया जाधव या ७१ वर्षांच्या असून त्यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक लोककलाकारांशी संवाद साधला. लावणी सम्राज्ञी मेघा घाडगेने देखील सोशल मीडियाद्वारे माया जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माया जाधव यांना या लॉकडाऊनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण त्यांना मदत मिळणे कठीण झाले आहे आणि त्यातही सोशल मीडियाचा वापर करणे त्यांना चांगल्याप्रकारे जमत नसल्याने या माध्यमातून त्यांना कोणाकडे मदत देखील मागता येत नाहीये. माया जाधव यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे.