"लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:23 PM2023-10-26T17:23:30+5:302023-10-26T17:24:09+5:30
"माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा शेवटचा सिनेमा एकच असणं...", 'पछाडलेला' फेम अभिनेत्री झाली भावुक
कॉमेडीचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज ६९वा वाढदिवस आहे. सदाबहार अभिनयाने त्यांनी कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केली. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी अभिनयाची छाप पाडली. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'धुम धडाका', 'झपाटलेला', 'शेजारी शेजारी', 'धडाकेबाज', 'मैने प्यार किया' अशा सुपरहिट चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडणारे लक्ष्मीकांत प्रेक्षकांचे लाडके लक्ष्या कधी झाले हे त्यांनादेखील कळलं नाही.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्टचा पूर आला आहे. चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीही लाडक्या लक्ष्याबरोबरच्या आठवणी वाढदिवसानिमित्त शेअर करत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी डान्सर मेघा घाडगे हिने देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. मेघा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 'पछाडलेला' सिनेमात एकत्र काम केलं होतं. मेघाने या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो मेघाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
"आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात...आज लक्ष्या मामांचा बर्थडे! खरंतर आजही, जवळजवळ १९ वर्षानंतर वाटत राहतं, अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील, "महेशला (महेश कोठारे) कॉल कर आत्ताच्या आत्ता.." माझ्या आयुष्यातला पहिला प्रदर्शित सिनेमा आणि 'द लक्ष्मीकांत बेर्डे' यांचा शेवटचा सिनेमा एकच असणं याचं शल्य काय असू शकतं.. याची कल्पना कुणालाही असण्याची शक्यता नाही. लहानपणी ज्यांचं कॉमेडी टायमिंग पाहून मी मोठे झाले, ज्यांचं इम्प्रोव्हायजेशन आजही अचाट करणारे वाटतात आणि मुळात ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला खळखळून हसवलं त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा कलेच्या प्रांगणातला एक समृद्ध अनुभव होता. हॅप्पी बर्थडे लक्ष्या मामा! We all miss you... तुमच्या अजरामर कामांतून, कलाकृतींमधून, अफाट परफॉर्मन्स मधून तुम्ही आजही आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात Alive आहात!", असं म्हणत मेघाने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
'पछाडलेला' हा एक भयपट आहे. २००४ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. त्यामुळे हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. महेश कोठारेंनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमात श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, वंदना गुप्ते या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. मेघनाने या चित्रपटात लावणी नर्तिकेची भूमिका साकारली होती.