लक्ष्मीकांत बेर्डेंनी फक्त १ रुपये मानधनात या चित्रपटात केले होते काम, वाचा हा अजब किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 06:00 AM2022-03-12T06:00:00+5:302022-03-12T06:00:00+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी चक्क एका चित्रपटासाठी फक्त एक रुपया मानधन घेतले होते आणि हा चित्रपट लोकप्रिय झाला होता.
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) म्हणजे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक महान व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या विनोदाने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडले होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी नेहमीच हाऊसफुलची पावती दिली होती. अशा या अभिनेत्याबद्दल आज एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चक्क एका चित्रपटासाठी फक्त एक रुपया मानधन घेतले होते. चकीत झालात ना? हो हे खरं आहे.
अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या सिनेमामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना विशेष स्थान असायचे. महेश कोठारे यांनी दिग्दर्शक म्हणून ज्यावेळी पहिला चित्रपट बनवला होता. त्यावेळी त्यांच्याकडे तितके बजेट नव्हते. त्यांनी लक्ष्मीकांत यांना आपल्या चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यांच्या हातात एक रुपया दिला. तो एक रुपया लक्ष्मीकांत यांनी आनंदाने स्वीकारला आणि त्यांनी संपूर्ण चित्रपट एक रुपये मानधनावर केला होता.
हिंदी चित्रपट प्यार किये जाचा मराठीत रिमेक महेश कोठारेंना बनवायचा होता. सर्व पात्रांची जुळवणी झाली पण मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी त्यांना पात्रच मिळेना. त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होते. झोपी गेलेला जागा झाला नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते. नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड झाली.
महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिले तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका खूप आवडली आणि त्यांनी मेहमूदच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. महेश कोठारेंचा दिग्दर्शन असलेला हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यानी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी या चित्रपटा संदर्भात चर्चा केली आणि चित्रपटासाठी होकार मिळवला. महेश कोठारेंनी लगेच खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिला. फक्त एका रुपयातच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हा चित्रपट केला त्या चित्रपटाचे नाव होते धुमधडाका. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे.