लक्ष्मीकांत बेर्डेंचे सख्खे भाऊदेखील आहेत अभिनेते, या कारणांमुळे ते आहेत सिनेइंडस्ट्रीपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:00 AM2023-03-10T07:00:00+5:302023-03-10T07:00:00+5:30
Laxmikant Berde : तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सख्ख्या भावाबद्दल माहित आहे का? तेदेखील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक काळ गाजवलेले लाडके दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे आजही असंख्य चाहते आहेत. आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनयाची गोडी बालपणातच लागली होती. तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सख्ख्या भावाबद्दल माहित आहे का? तेदेखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर त्यांच्या भावाचे नाव आहे रविंद्र बेर्डे (Ravindra Berde). रविंद्र बेर्डे सध्या ७७ वर्षांचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. सध्या ते आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य नातवंडांसोबत सुखाने व्यतित करत आहेत.
वयाच्या विसाव्या वर्षी रविंद्र बेर्डे नभोवाणीशी जोडले गेले होते. १९६५ साली ते आकाशवाणीच्या नभोनाट्यांचे दिग्दर्शन करत होते. इथूनच त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध जुळला. नभोवाणीत त्यांनी २४ वर्षे सेवा केली होती, त्यानंतर १९८७ साली त्यांना नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. नाटकात काम करत असताना रविंद्र बेर्डेंना विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३१ नाटकातून काम केले होते. यातूनच पुढे ते चित्रपटातून देखील महत्वाच्या भूमिका साकारु लागले. बेरकी नजर आणि खलनायकी ढंगाचा बाज असल्याने बऱ्याचदा ते विरोधी भूमिकेत दिसले. जवळपास ३०० हून जास्त मराठी चित्रपट आणि जवळपास ५ हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले होते.
यासोबत दूरदर्शन वरील मालिका, जाहिरातीतही त्यांनी काम केले. अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, चंगु मंगु, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ते अगदी भरत जाधव यांच्यासोबत काम केले. १९९५ सालच्या दरम्यान व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर २०११ सालापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होते. त्यामुळे ते सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत.