जाणून घ्या किर्ती किल्लेदारचा महाराष्ट्रापासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा हटके प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 09:33 AM2017-02-24T09:33:33+5:302017-02-24T15:34:44+5:30

सुवर्णा जैन आपल्या सूरेल आवाजाने मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवणारी पार्श्वगायिका म्हणजे किर्ती किल्लेदार. सिनेमा असो किंवा मालिका आपल्या ...

Learn about the journey of Kirti Keldar from Maharashtra to South Indian Film Festival | जाणून घ्या किर्ती किल्लेदारचा महाराष्ट्रापासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा हटके प्रवास

जाणून घ्या किर्ती किल्लेदारचा महाराष्ट्रापासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा हटके प्रवास

googlenewsNext
ong>सुवर्णा जैन

आपल्या सूरेल आवाजाने मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवणारी पार्श्वगायिका म्हणजे किर्ती किल्लेदार. सिनेमा असो किंवा मालिका आपल्या सूरांच्या जादूने तिच्या आवाजाची किर्ती थेट रसिकांच्या काळजापर्यंत पोहचलीय. 'दुनियादारी' सिनेमातले ''देवा तुझ्या गाभा-याला'' असो किंवा मग 'का रे दुरावा' मालिकेचे शीर्षकगीत. आपल्या आवाजामुळे तिची किर्ती महाराष्ट्राच नाहीतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियापर्यंत पोहचलीय. नुकतंच किर्तीचा नवा मॅशअप रसिकांच्या भेटीला आलाय. याचनिमित्ताने किर्तीशी साधलेला हा दिलखुलास संवाद.

 
प्रेमाची सांगितीक अनुभूती देणारा मॅशअप रसिकांच्या भेटीला आला आहे. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.कशी सुचली या मॅशअपची कल्पना ?
 

मनात फक्त एक विचार आला आणि चटकन ती प्रत्यक्षात उतरवली. इंग्रजी आणि हिंदी गाण्याचे मिश्रण असलेला हा मॅशअप यूट्यूबवर आला आणि नेटिझन्सच्या पसंतीस उतरला. आठवड्याभरात रेकॉर्डिंग आणि त्याचे शूटही झाले. याच काळात व्हॅलेन्टाईन डेही होता, त्यामुळे इंग्लिश हिंदीचे कॉम्बिनेशन असलेले हा मॅशअप  रसिकांनाही आवडला. दोन भाषांचा वापर केला कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. एका भाषेत हा प्रयोग केला असता तर ठराविक रसिकांपर्यंतच पोहचले असते. जस्टिन बबिरचे हे गाणे असून तेच मी माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्या भाषांमधील गाणी ऐकत असते. वेस्टर्न म्युझिक मी शिकलेली नाही, मात्र इंग्रजी संगीत जास्त ऐकते. हिंदी, मराठी गाणी आपण ऐकतच असतो. मात्र आता सारं काही वेस्टर्ननाईज झाले आहे. त्यामुळे ऐकून ऐकूनच इंग्रजी गाणीही शिकलेय. माझी ही काही आवडती गाणी आहेत. पुढेही मला असा प्रयोग करत राहायचे आहे. फ्युजन करून वेगळगेळे जसे येईल तसा प्रयोग करणे आवडते. बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये हे शूट केले आहे. लोकेशनही खूप चांगले डेकोरेट करण्यात आले आहे. त्यामुळे या मॅशअप पॉप स्टाइलप्रमाणेच वाटतो. सध्या काही गाणी खूप चांगली येतात. एकूणच लोक एक्सपिरिमेंट करू लागलेत. आधी लोकांची आवडानिवड होती. आता तसे राहिलेले नाही. ओपन मार्केट झाल्यामुळे आता तुम्ही नवनवीन गोष्टी देऊ शकतात. लोकानांही तेच ते ऐकण्यापेक्षा नवीन गोष्टी ऐकायला आवडतात.
 
 
सोशल मीडियावर आधी अल्बम आणण्याचं कारण काय ? सोशल मीडिया किती प्रभावी आहे असं तुला वाटते ?
 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये भरपूर काम केले आहे आणि रसिकांचे तितकेच प्रेमही मिळते. त्यामुळे सोशल मीडियामुळे आपल्या फॅन्सपर्यंत सहज पोहचता येते. प्रत्येकजण चांगल्या संधीची वाट पाहतो. ती प्रतीक्षा केलीच पाहिजे. मात्र काही करुन दाखवायचे असेल आणि जे तुम्हाला सुचते आहे ते करायचे असेल तर सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया आहे असे मी मानते. कारण हे व्यासपीठ सगळ्यांसाठी खुले आहे. तुमचे काम चटकन लोकांपर्यत पोहचते. महत्त्वाचे म्हणजे जराही वेळ न दवडता तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा इथेच लगेच कळतात. त्यामुळे सोशल मीडिया हे उत्तम आणि तितकेच मनोरंजक माध्यम आहे.
 
'दुनियादारी' सिनेमातील गाणे आणि छोट्या पडद्यावरील मालिकेसाठीचं गायन याचा तुझ्या करियरला कसा फायदा होत आहे ?
 

 
'दुनियादारी' सिनेमातील देवा तुझ्या गाभा-याला... हे गाणं माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होते. आदर्शचा आवाज पारंपरिक लोकसंगीत आणि फ्युजन प्रकारासारखा होता. त्याच्यासोबत गाताना मजा आणि एक वेगळा अनुभव आला. या गाण्याने मला नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर मंगलाष्टक वन्स मोर या सिनेमात मी गायले. यानंतर 'का रे दुरावा' या मालिकेतच्या शीर्षक गीतामधून घराघरात मी पोहचले. इतरही भाषांमध्ये मी गाणी गायली आहेत. तामिळ, उडिया या भाषेतही गाणी गायली आहे.विविध भाषांमध्ये गाणे हे खूप आव्हानात्मक असते तरीही त्यात खूप मजा असते. उच्चार कसे करायचे ते आपल्या भाषेत लिहून मग गाणे अशी एक प्रक्रिया असते.आगामी एक तामिळ प्रोजेक्टवर काम करत आहे.तसेच आगामी'1980 अ लव्ह मॅरेज' या सिनेमातही माझ्या आवाजतले गाणे रसिकांना ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर हिंदी मालिका ‘जाना ना इस दिल से दूर’ या नव्या मालिकेचेही शीर्षक गीत जावेद अलीसह गायले आहे. याशिवाय आणखी काही नव्या प्रोजेक्टवर काम करतेय. मालिका रोज पाहिल्या जाता. सध्या मालिकांचे शीर्षक गीत चांगलीच गाजत आहे. ते सुद्धा एक उत्तम व्यासपीठ आहे असे मला वाटते. मालिकांसाठी गाणे खूप आव्हानात्मक असते असे मला वाटते कारण एक मिनिटात तुम्हाला ते गाऊन त्या मालिकेचा संदेश रसिकांपर्यंत पोहचवायचा असतो.
 
 
दाक्षिणात्य सृष्टीत तुझी एंट्री कशी झाली आणि रियालिटी शोबद्दल काय वाटते ?
 

दाक्षिणात्य भाषेत जेव्हा गाते तेव्हा त्यांना आपलीशी वाटेल अशी गाणी गाते. माझी काही गाणी तिकडच्या संगीतकारांनी ऐकली होती. त्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि माझी सुरुवात झाली. आपल्या जीवनातील असे छोटे छोटे टप्पे करियरसाठी खूप खूप महत्त्वाचे असतात. बरेच लोक महाराष्ट्राच्या बाहेरुन मुंबईत येतात. आपल्या स्वप्नांची सुरुवात कुठून तरी व्हावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे अशा प्रत्येकासाठी रियालिटी शो खूप मोलाची भूमिका निभावू शकतात. मात्र त्यातील यशापयशावर सारं काही अवलंबून असू नये असं मला वाटते. कारण या रियालिटी शोमध्ये तुम्ही जिंकला किंवा नाही जिंकलात याचा तुमच्या स्वप्नपूर्तीवर फरक पडता कामा नये. हरलो तरी खचून न जाता आयुष्यात पुढे जायला हवे. कारण त्यानंतरही जग खूप मोठे आहे. अपयश, निराशा सहन करण्याची ताकद आणि मेहनत करण्याची जिद्द तुमच्यात हवी. रियालिटी शो तात्पुरती प्रसिद्धी मिळवून देतात. मात्र ती प्रसिद्धी कायमस्वरुपी टिकवून ठेवायची असेल तर सातत्याने मेहनत करायलाच हवी. महान आणि प्रसिद्ध गायक कसे गातात, त्यांची गाण्याची पद्धत, त्यांची गाणे ऐकणे, आजवर त्यांनी मिळवलेले यश, रसिकांच्या मनात मिळवलेले अढळ स्थान हे सारे काही एक शिकण्याचा भागच असतो असे मला वाटते. रियालिटी शोमध्ये जाणे, ते जिंकणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता पुढे कायम शिकत राहणे, मेहनत करणे गरजेचे आहे. रियालिटी शो पलिकडे जाऊन करियरच्या दृष्टीने विचार करायला हवा. कारण ही शिकणे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे.

Web Title: Learn about the journey of Kirti Keldar from Maharashtra to South Indian Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.