महेश मांजरेकरांच्या ह्या चित्रपटात दिग्गजांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 11:13 AM2018-09-28T11:13:54+5:302018-09-30T07:15:00+5:30
‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणे हे दिग्दर्शकासाठी मोठे आव्हान असते. काही दिग्दर्शकांना मात्र हे कसब चांगलेच अवगत असते. हिंदीपासून मराठीपर्यंत नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या विषयावरील सिनेमे बनवणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश वामन मांजरेकर यांनी कायम बड्या कलाकारांसोबत सिनेमे केले आहेत. ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी मराठी सिनेमाही याला अपवाद नाही. या सिनेमात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर हे दिग्गज एकत्र दिसणार आहेत. ‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
‘न्यायदेवता आंधळी असते...आम्ही डोळस होतो’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये पाच दिग्गजांचे एकत्र येणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात नायकाच्या भूमिकेत दिसलेल्या गोखलेंनी साकारलेल्या चरित्र भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. सतीश आळेकर हे नाव एकांकिकांपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत आणि छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यार्पंत विविध पातळीवर गाजलेलं आहे. अशोक सराफ हे केवळ नावच खूप आहे. विनोदी अभियनाचा बादशहा असे विरुद मिरवणाऱ्या अशोक सराफ यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आपल्या अनोख्या अभिनयशैलीमुळे छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यार्पंत अबालवृद्धांना मोहिनी घालण्याचे कसब शिवाजी साटम यांच्याकडे आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचे कौशल्य दिलीप प्रभावळकरांच्या ठायी आहे.
अशा सर्व दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचे काम दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी ‘मी शिवाजी पार्क’ या संवेदनशील कलाकृतीच्या माध्यमातून केले आहे. या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस आदि बरेच कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. सिनेमाचं शीर्षक आणि टॅगलाईन पाहता ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये काहीतरी गहन विषय मांडण्यात आल्याची चाहूल नक्कीच लागते. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.