जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे, रवींद्र महाजनींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 01:15 PM2023-07-16T13:15:59+5:302023-07-16T13:16:24+5:30
Ravindra Mahajani: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी हे काल पुण्यातील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत मीडिया आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चांवरून आता प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांनी संताप व्यक्त केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी हे काल पुण्यातील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत मीडिया आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चांवरून आता प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांनी संताप व्यक्त केला आहे. काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. पण ते गेल्या पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे!, अशी संतप्त प्रतिक्रिया हेमांगी कवी यांनी व्यक्त केली आहे.
फेसबुकवर याबाबत लिहिलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, काल जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मीडियावरून आणि नंतर वृत्तावाहिन्यांवरून याबाबतची माहिती मिळाली. पण त्यांच्या जाण्यापेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे! बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची आता स्टाईलच झाली आहे. त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच.
पण त्या बातम्यांवर आलेल्या प्रतिक्रिया वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रद्धांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना लोक त्यांच्या मुलाबद्द्ल, पत्नीबद्दल वाट्टेल ते बोलत सुटले. असं मरण अनेक लोकांना येत असावं, पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना आपण घेतला, असं त्या म्हणाल्या.
ज्या हीरोला आपण लहानपणापासून पहात आलोय. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं मला खूप Surreal वाटतं ! ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रवींद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते! गश्मीर महाजनी आधीच इतका स्ट्रगल करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry! And Strength to you, boy! हो सोशल मीडियावर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तारतम्य ठेवलं तर चालणार नाही का? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास!, असा संताप हेमांगी कवी यांनी व्यक्त केला आहे.
जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे, रवींद्र महाजनींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप