'चला आपल्या बालपणात परत जाऊयात!', तेजश्री प्रधान पुन्हा रमली बालपणात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:43 PM2021-06-25T18:43:21+5:302021-06-25T18:44:08+5:30
तेजश्री प्रधान हिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पुन्हा बालपणात रमलेली दिसते आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तेजश्री सध्या काम करताना दिसली नसली तरीदेखील ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्क साधत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पुन्हा बालपणात रमलेली दिसते आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती कलरबुकमधील चित्रांमध्ये रंग भरताना दिसते आहे. तिचा हा फोटो तिची मैत्रिण आणि अभिनेत्री सुरूची अडारकर हिने क्लिक केला आहे. तेजश्रीने हा फोटो शेअर करत लिहिले की, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, बऱ्याच गोष्टी आपल्यापासून दूर गेल्या आहेत. मला स्वतःला पेटिंग करायला आवडते. कलर थेरेपी सुचवल्यामुळे मी ऋतू आणि ओमी तुझे आभारी आहे. यामुळे माझा मूड कलरफुल आणि आनंदी राहतो. तुम्ही पण हे ट्राय करून पहा. चला आपल्या बालपणात परत जाऊयात. आनंदी जीवन.
तेजश्री प्रधान शेवटची झी मराठी वाहिनीवरील मालिका अग्गंबाई सूनबाईमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. मालिका संपल्यानंतरही तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. तेजश्री प्रधान लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे बबलू बॅचलर. या चित्रपटात तिच्यासोबत शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बबलू बॅचलर या चित्रपटात शर्मन जोशी आणि तेजश्री यांची जोडी जमली असून त्यांनी याआधी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.