जगण्याची बाप गोष्ट सांगणारा जिंदगी विराट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 04:39 AM2017-09-18T04:39:44+5:302017-09-18T10:09:44+5:30
अनेक कथा, कादंबऱ्यांमधून रंगवला गेलेला बाप हा मुलाच्या सुखासाठी वाट्टेल तो त्याग करणारा नायक असतो अथवा मुलाच्या सुखाच्या आड ...
>अनेक कथा, कादंबऱ्यांमधून रंगवला गेलेला बाप हा मुलाच्या सुखासाठी वाट्टेल तो त्याग करणारा नायक असतो अथवा मुलाच्या सुखाच्या आड येणारा व्यसनी खलनायक असतो. परंतु आपण बाप या व्यक्तिरेखेकडे माणूस म्हणून बघायचे विसरतो. या बापाचीही काही स्वप्नं असू शकतात, आयुष्याकडून अपेक्षा असू शकतात. पण बापाने मुलासाठी त्याग करायचा असतो या गोंडस विचाराच्या नादात ही स्वप्ने, या अपेक्षा विचारात घ्यायला आपण विसरून जातो. ‘जिंदगी विराट’ ही अशाच एका बापाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाची गोष्ट आहे.
अंजनेय साठे एन्टरटेनमेंट निर्मित ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा अतरंगी गावात घडते. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडाला कावळा शिवणे या विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मृत्यूकडे नेहमीच नकारात्मक भावनेने बघितले जाते. परंतु जन्म-मृत्यू आणि त्या संबंधीत मानवी भावभावना अत्यंत तरल पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.
दिग्दर्शक सुमित संघमित्र यांचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी पेलली आहे. या चित्रपटात मंदार चोळकर आणि सुरज-धीरज यांनी लिहिलेली एका पेक्षा एक सरस अशी तीन भन्नाट गाणी आहेत, जी सुरज-धीरज या जोडगोळीने संगीतबद्ध केली असून चित्रपटाला पार्श्वसंगीतदेखील त्यांनीच दिले आहे. या चित्रपटातील गाण्यांना सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी, जावेद अली यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी आपला आवाज देऊन चार चाँद लावले आहेत. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मातीपदाची धुरा पद्मिनी सिसोदे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सत्यजीत शोभा श्रीराम यांनी केले असून कुणाल वाळवे यांनी संकलन केले आहे. चित्रपटासाठी उमेश सूर्यवंशी यांनी कलादिग्दर्शन केले असून वेशभूषेची जबाबदारी स्नेहा कुमारने पेलली आहे.
ओम भूतकर, सुमित संघमित्र, निनाद गोरे या तरुण कलाकारांची किशोर कदम, अतुल परचुरे, भाऊ कदम, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांबरोबर रंगलेली अभिनयाची जुगलबंदी ‘जिंदगी विराट’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.