'कोळश्याच्या खाणीत काम करण्यासारखं...'; राजकारणात प्रवेश करण्याबाबत नागराज मंजुळे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:04 IST2023-04-04T17:04:20+5:302023-04-04T17:04:56+5:30
Nagraj Manjule : 'घर बंदूक बिरयानी'मध्ये नागराज मंजुळेंनी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

'कोळश्याच्या खाणीत काम करण्यासारखं...'; राजकारणात प्रवेश करण्याबाबत नागराज मंजुळे स्पष्टच बोलले
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. झी स्टुडिओज’ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा त्यांचा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त चित्रपटातील कलाकार आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि निर्माते मंगेश कुलकर्णी प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाच्या एका मुलाखतीदरम्यान राजकारणात प्रवेश करण्याबाबतचे नागराज मंजुळेंनी स्पष्ट मत मांडले आहे.
नागराज मंजुळे यांनी लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत भविष्यात या समाजात बदल घडवण्यासाठी पुढेमागे राजकारणात यायची संधी मिळाली तर ते या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहेत की नाहीत? असे विचारण्यात आले. या प्रश्नांचे त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. याबद्दल नागराज म्हणाले, हे जरा अतीच झाले म्हणजे स्वतःच बोलिंग टाकायची, स्वतःच बॅटिंग करायची, स्वतःच तो बॉल अडवायचा आणि प्रेक्षक म्हणून स्वतःच चीयर पण करायचं. समस्या सोडवायला मीच जायचे हे जरा अवघड काम आहे. मी एक कलाकार आहे, आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी जो संयम हवा तो माझ्यात नाही, मी अत्यंत साधा सरळ माणूस आहे. साधा म्हणजे अगदी भोळा या अर्थाने नाही.
राजकारण या क्षेत्राविषयी बोलताना नागराज पुढे म्हणाले, राजकारणात काम करणे अवघड काम आहे, ते वाईट काम अजिबात नाही. त्यासाठी प्रचंड वेळ खर्ची करावा लागतो. राजकीय काम करणे म्हणजे कोळश्याच्या खाणीत काम करण्यासारखे आहे, डाग हा लागणारच. आपण किती नावं ठेवतो हा वाईट तो वाईट असे ठरवतो. पण हे खूप महत्त्वाचे आणि देशाला घडवणारे काम आहे. या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो माझे बरेच राजकीय मित्र आहेत, त्यांना छोट्यातल्या छोट्या मतदार संघातील माणसाचा फोन घ्यावा लागतो, त्यांना वेळ द्यावा लागतो. त्या लोकांमध्ये हे जे गुण आहेत ते माझ्यात आत्ता तरी नाहीत. जग बदलायला आपल्याकडे बरीच मोठी लोकं आहे, मी काय चित्रपट नीट करतोय तेच महत्त्वाचं आहे उगाच मी सगळ्यात लुडबूड करणं योग्य नाही.