प्रेमाची संगीतमय सफर ‘काय झालं कळंना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:27 PM2018-07-18T17:27:57+5:302018-07-18T17:29:57+5:30
‘काय झालं कळंना’मध्ये स्वप्नील काळे आणि गिरीजा प्रभू यांच्यासोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
प्रेमकथेवर आधारित असलेल्या सिनेमांमध्ये गीत-संगीताची बाजू प्रेम अधोरेखित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच प्रेमकथेला संगीताची साथ देण्याची फार मोठी परंपरा भारतीय सिनेसृष्टीत आहे. याच परंपरेचा वारसा पुढे चालवणारा ‘काय झालं कळंना’ हा प्रणयपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्रेमात पडल्यावर प्रत्येकाची अवस्था या सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणेच होते. आपण काय करतोय? काय खातोय? कसं वागतोय? या कशाचंही भान प्रेमात पडलेल्या व्यक्तीला राहात नाही. याच कारणांमुळे या सिनेमासाठी ‘काय झालं कळंना’ हे शीर्षक समर्पक वाटतं. मालिकांसोबतच सिनेमा दिग्दर्शनाचाही अनुभव गाठीशी असणाऱ्या सुचिता शब्बीर यांनी ‘काय झालं कळंना’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती पंकज गुप्ता यांनी केली आहे. दिग्दर्शनासोबतच सुचिता यांनी या सिनेमाची कथाही लिहिली आहे.
प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा हा सिनेमा प्रेमासोबतच आपली कर्तव्यही प्रत्येकाने पार पाडायला हवीत असा मोलाचा संदेश देतो. केवळ प्रेयेसी किंवा प्रियकरावर प्रेम करायला न शिकवता त्यासोबतच ज्यांनी आपलं पालणपोषण केलं त्यांच्या प्रेमाचंही भान राखायला, मान राखायला हवा असंही ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा सांगतो. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी ‘काय झालं कळंना’ची पटकथा लिहिली आहे.
प्रेमाचे हे नवे पैलू सादर करण्यासाठी सुचिता यांनी नवोदित कलाकारांची जोडी निवडली आहे. स्वप्नील काळे आणि गिरीजा प्रभू या नव्या जोडीची केमिस्ट्रीही या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वप्नील-गिरीजाच्या या प्रेमकथेला सुमधूर संगीताचा साज चढवण्याचं काम संगीतकार पंकज पडघन यांनी केलं आहे. माधुरी आशिरगडे, वलय आणि शौनक शिरोळे यांनी ‘काय झालं कळंना’ मधील गीतं लिहिली आहेत. पंकज यांनी आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांच्या आवाजात ती स्वरबद्ध केली आहेत. एकूण पाच गाणी या सिनेमात आहेत.
‘काय झालं कळंना’मध्ये स्वप्नील काळे आणि गिरीजा प्रभू यांच्यासोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर या कलाकारांच्याही भूमिका आहेत. कथालेखन आणि दिग्दर्शनाच्या जोडीला सुचिता यांनी राहुल मोरेंच्या साथीने या सिनेमासाठी संवादलेखनही केलं आहे. याशिवाय त्यांनी कोरिओग्राफर सुजित कुमारसोबत या सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफीही केली आहे. अशाप्रकारे ‘काय झालं कळंना’च्या निमित्ताने अष्टपैलू कामगिरी करत सुचिता यांनी या सिनेमाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. कॅमेरामन सुरेश देशमाने यांचं छायालेखन ही प्रेमकथा प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यासाठी पुरेसं ठरणारं आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली असून, अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं कार्यकारी निर्मात्याचं काम शब्बीर पुनावाला यांनी पाहिलं आहे.