पुन्हा फडात रंगणार लव्हस्टोरी - सुवर्णा काळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 10:07 AM2017-11-03T10:07:31+5:302017-11-03T15:37:31+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची सुरुवातीपासूनच निर्मिती केली जात असून, त्यास प्रेक्षकांचा आजही उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काळात आलेल्या तमाशाप्रधान चित्रपटांवरून ही बाब स्पष्ट होते.

Lovestory will be shot again - Suvarna Kale | पुन्हा फडात रंगणार लव्हस्टोरी - सुवर्णा काळे

पुन्हा फडात रंगणार लव्हस्टोरी - सुवर्णा काळे

googlenewsNext
मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची सुरुवातीपासूनच निर्मिती केली जात असून, त्यास प्रेक्षकांचा आजही उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काळात आलेल्या तमाशाप्रधान चित्रपटांवरून ही बाब स्पष्ट होते. आता पुन्हा एकदा अशाच आशयचा ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट येत असून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा तमाशाच्या फडात रंगलेली एका लव्हस्टोरी बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाविषयी अभिनेत्री सुवर्णा काळे हिच्याशी संवाद साधला असता, तिने दिलखुलासपणे चित्रपटाच्या प्रवास सांगितला. 


प्रश्न : यापूर्वीदेखील तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती केली गेली, अशात या चित्रपटाचे वेगळेपण कसे सांगशील?
- खरं तर या चित्रपटाच्या सुरुवातीचा भाग जरी तमाशाप्रधान वाटत असला तरी, नंतरच्या भागात चित्रपट पूर्णत: प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटात १९७० ते ८०चा काळ दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट काहीसा संस्कृतीप्रधान आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. त्यातच निर्माते चंद्रकांत जाधव यांनी चित्रपटाला अस्सल मराठमोळा टच दिल्याने चित्रपट एक उंची गाठतो. चित्रपटात एकापेक्षा एक सरस आणि अवीट गोडीची गाणी आणि लावण्यांचा साज प्रेक्षकांना एक अभूतपूर्व आनंद देऊन जाईल, हेच या चित्रपटाचे वेगळेपण आहे. 

प्रश्न : चित्रपटात तू नर्तकीची भूमिका साकारली आहे, याकरिता तुला काही विशेष प्रशिक्षण घ्यावे लागले काय?
- माझे कथ्थक झालेले असल्याने मला नृत्य करताना फारशा अडचणी आल्या नाहीत. परंतु हे नृत्य तमाशाप्रधान असल्याने मला त्यासाठी खूप काही शिकावे लागले हेही तेवढेच खरे आहे. त्यासाठी मी जयश्री गडकर, उषा चव्हाण यांच्या भूमिका असलेले चित्रपट बघितले. चित्रपटात १९७० ते ८०चा काळ दाखविण्यात आला असल्याने त्याकाळात अशा आशयाचे चित्रपट गाजविणाºया अभिनेत्रींचे निरीक्षण मी केले. खरं तर मला नृत्यासाठी शालेय जीवनापासूनच बक्षिसे मिळालीत. मात्र या चित्रपटात नृत्य करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, असे मी समजते. 

प्रश्न : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली जात आहे, अशात पारंपरिक विषयावरील चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतील असे तुला वाटते?
- होय, मराठी चित्रपटसृष्टीत खूपच दमदार आणि प्रेक्षकांना भावतील अशा चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. वास्तविक जर तुम्ही सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवली तर मराठी प्रेक्षक त्याचे खुल्यादिलाने स्वागत करतात असे मला वाटते. पारंपरिक विषयांवरील चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटांनी आपली संस्कृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास मदत केली आहे. त्यामुळेच आजही या विषयांवरील चित्रपटांना मराठी प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही गेल्या काळातील काही पारंपरिक विषयांवरील चित्रपटांचा विचार केल्यास, तुमच्या लक्षात येईल की या चित्रपटांना आजही प्रेक्षक दाद देत आहेत. 

प्रश्न : तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?
- सध्या तरी मी ‘छंद प्रितीचा’ या एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रित करून आहे. या चित्रपटासाठी मी आणि माझ्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. ज्या पद्धतीने सर्व बारिक-सारिक गोष्टी लक्षात घेऊन चित्रपटाची निर्मिती केली गेली त्यावरून या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार याविषयी खात्री वाटते. आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टवर काम करायचे याविषयी सध्या मी विचार करीत आहे. त्यासाठी मी चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत आहे. 

Web Title: Lovestory will be shot again - Suvarna Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.