'लकी' फेम मयुर मोरे झळकणार 'कोटा फॅक्टरी'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 08:00 AM2019-04-14T08:00:00+5:302019-04-14T08:00:00+5:30

'लकी' या मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता मयुर मोरे लवकरच 'कोटा फॅक्टरी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)वर ही ड्रामा सीरिज पहायला मिळणार आहे.

'Lucky' fame Mayur More will be seen in 'Kota Factory' | 'लकी' फेम मयुर मोरे झळकणार 'कोटा फॅक्टरी'मध्ये

'लकी' फेम मयुर मोरे झळकणार 'कोटा फॅक्टरी'मध्ये

googlenewsNext

'लकी' या मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता मयुर मोरे लवकरच 'कोटा फॅक्टरी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)वर ही ड्रामा सीरिज पहायला मिळणार आहे. ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते. ही सीरिज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवली जाणार आहे. 

'कोटा फॅक्टरी' ही वैभव (मयूर मोरे) या १६ वर्षांच्या मुलाची कथा आहे. जेईई पास करून आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न घेऊन वैभव कोटाला आला आहे. मंगळवारी १६ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणाऱ्या कोटा फॅक्टरीमध्ये जितेंद्र कुमार (जीतू), अहसान चन्ना (शिवानी), रेवती पिल्लई (वर्तिका), आलम खान (उदय) आणि रंजन राज (मीना) यांच्याही भूमिका आहेत.


प्राध्यापकांची भूमिका साकारणारे जितेंद्र कुमार म्हणाले, ''कोटा फॅक्टरी'सोबत अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. हा माझ्यासाठी फारच छान अनुभव होता. कोटामध्ये राहत असताना मी बऱ्याचदा माझ्या शिक्षकांच्या नकला करायचो आणि आम्ही सगळेच त्यावर खूप हसायचो. खरेतर तिथूनच माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीलाही सुरुवात झाली. आता इतक्या वर्षांनंतर कोटातील शिक्षकाची भूमिका साकारताना त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपापसातील वागणे आणि त्यांचे तिथले आयुष्य चोख दर्शवणारा कोटा फॅक्टरी हा अगदी अनोखा शो आहे. या शोमध्ये जे काही समोर येणार आहे, ते दर्शकांना आवडेल, अशी आशा आहे.'


मयुर मोरे म्हणाला, ''कोटा फॅक्टरी' माझ्या म्हणजे वैभवच्या नजरेतून घडताना दिसते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील या टप्प्यातील चढउतार यात आहेत. याप्रकारच्या शोचा भाग असणे ही माझ्यासाठी फार मोठी संधी आहे आणि हा शो बनवण्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीचे प्रेक्षक कौतुक करतील, अशी आशा आहे.'


'कोटा फॅक्टरी' या टीव्हीएफ ओरिजनल सीरिजचे दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले आहे. कोटा फॅक्टरी टीव्हीएफप्ले आणि यूट्यूबवर १६ एप्रिलला पहायला मिळणार आहे.

Web Title: 'Lucky' fame Mayur More will be seen in 'Kota Factory'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.