सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चं मधुराणी प्रभुलकरने केलं कौतुक, सांगितलं का बघायचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:33 IST2025-01-15T15:32:47+5:302025-01-15T15:33:11+5:30
'संगीत मानापमान' पाहून मधुराणी थक्क झाली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चं मधुराणी प्रभुलकरने केलं कौतुक, सांगितलं का बघायचा सिनेमा
सुबोध भावेचं दिग्दर्शन असलेल्या 'संगीत मानापमान' या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर १० जानेवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. कट्यार काळजात घुसली नंतर पुन्हा एकदा संगीतमय सिनेमा भेटीला येत असल्याने चाहतेही आतुर होते. आता सिनेमाला प्रेक्षकांचंही प्रेम मिळत आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनेदेखील 'संगीत मानापमान' सिनेमाचं कौतुक केलं आहे.
'संगीत मानापमान' पाहून मधुराणी थक्क झाली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. "कालच मी संगीत मानापमान हा चित्रपट मी बघून आले आणि मला अतिशय आवडला. अप्रतिम चित्रिकरण आणि सगळी गाणी म्हणजे कानांना अक्षरश: मेजवानी असं म्हणायला हरकत नाही. कट्यार काळजात घुसलीनंतर सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. आणि तोदेखील तितकाच उत्तम वठला आहे. एका काळात हा सिनेमा आपल्याला घेऊन जातो आणि त्या काळात आपण रमतो. तुम्हीदेखील जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा", असं मधुराणी व्हिडिओत म्हणत आहे.
दरम्यान, 'संगीत मानापमान' सिनेमात सुबोध भावेसोबत वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, सुमीत राघवन हे कलाकार आहेत. 'संगीत मानापमान' सिनेमा हा संगीतप्रेमींसाठी जणू एक पर्वणीच आहे. कट्यार काळजात घुसलीनंतर सुबोध भावेने 'संगीत मानापमान'च्या निमित्ताने दुसऱ्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.