'माहेरची साडी'च्या यशानंतर विजय कोंडकेंचा 'लेक असावी तर अशी' येणार, ओंकार भोजनेचीही सिनेमात वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 02:39 PM2024-04-04T14:39:06+5:302024-04-04T14:39:41+5:30
'माहेरची साडी' सिनेमानंतर 'लेक असावी तर अशी' सिनेमातून विजय कोंडके नवी कोरी कथा घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. या सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजनेचीही वर्णी लागली आहे.
९०च्या दशकातील सर्वाधिक गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे 'माहेरची साडी'. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. सुपरहिट ठरलेल्या काही मोजक्या मराठी सिनेमांपैकी 'माहेरची साडी' हा सिनेमा एक आहे. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आणि आजही हा सिनेमा टीव्हीवर पाहताना लक्ष्मीच्या यातना बघून बायका तितक्याच रडतात. 'माहेरची साडी' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
'माहेरची साडी' सिनेमानंतर 'लेक असावी तर अशी' सिनेमातून विजय कोंडके नवी कोरी कथा घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून या 'लेक असावी तर अशी'साठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. प्रेम, जिव्हाळा आणि भावनांनी पूरेपूर असलेला सुंदर फॅमिली ड्रामा कॉमेडीच्या तडक्यासहित प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेचीही वर्णी लागली आहे. ओंकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'लेक असावी तर अशी' सिनेमाच्या पोस्टरवर ओंकार पाहायला मिळत आहे. या सिनेमात तो कोणती भूमिका साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याआधी ओंकार एकदा येऊन तर बघा, सरला एक कोटी या सिनेमांमध्ये दिसला होता.
दरम्यान, 'लेक असावी तर अशी' हा सिनेमा २६ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री गार्गी दातार मुख्य भूमिकेत असणार आहे. याबरोबरच यतिन कार्येकर, शुभांगी गोखले, कमलेश सावंत, सुरेखा कुडची, अभिजीत चव्हाण, नयना आपटे, सविता मालपेकर, प्राजक्ता हणामघर, प्रतिक भंडारी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.