'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:54 PM2024-10-10T16:54:58+5:302024-10-10T16:56:38+5:30
'फुलवंती' सिनेमाद्वारे प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. यामध्ये हास्यजत्रेतील कलाकारही झळकले आहेत.
प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) आगामी 'फुलवंती' सिनेमा उद्या रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. हा प्राजक्ताचा पहिलाच निर्मित सिनेमा आहे. त्यामुळे तिचं निर्माती बनण्याचं स्वप्न साकार झालं आहे. 'फुलवंती' बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) शोमधील कलाकारांचीही झलक दिसते. हास्यजत्रेतील कलाकारांनी प्राजक्ताकडून किती मानधन घेतलं माहितीये का?
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताला सिनेमातील हास्यजत्रेच्या कलाकारांच्या कास्टिंगविषयी विचारण्यात आलं. यावर प्राजक्ता खूश होऊन म्हणाली, " होय मी त्यांना ठरवून कास्ट केलं आहे. माझी खूप इच्छा होती की ज्या शोसोबत मी निगडीत आहे, जो शो माझ्या हृदयाच्या इतक्या जवळचा आहे. तर माझ्या पहिल्या निर्मित सिनेमात माझे आवडीचे कलाकार असावेत. असे काही सीन्स आमचे शूट करायचे राहिले होते ज्यात त्यांची निवड अतिशय चपखल होती. म्हणून मी सगळ्यांना प्रेमाने विनंती केली आणि सगळे अजिबात मानधन न घेता आलेत. सिनेमात जी काही जत्रा तुम्ही पाहाल त्यांची छोटी भूमिका आहे पाहुणे कलाकार आहेत पण ते आहेत हे खरंय.
'फुलवंती'मध्ये गौरव मोरे, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, चेतना भट, रोहित माने यांच्या छोट्या भूमिका आहेत. प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्यजत्रेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिचं या शोमधील सूत्रसंचालन महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस पडलं. म्हणूनच तिने आपल्या या महत्वाच्या सिनेमात हास्यजत्रेतील कलाकारांनाही घेतलं. तसंच हे कलाकारही मानधन न घेता आले. प्राजक्ताचा हास्यजत्रेतील कलाकारांसोबत खास बाँड असल्याचं सोशल मीडियावर बरेचदा पाहायला मिळालं आहे.
'फुलवंती' उद्या ११ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. स्नेहल तरडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात उतरली आहे. यामध्ये गश्मीर महाजनीचीही मुख्य भूमिका आहे.