महेश कोठारे यांच्या आई तथा ज्येष्ठ रंगकर्मी जेनमा कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:12 PM2023-07-15T22:12:42+5:302023-07-15T22:14:54+5:30

Jenma Kothare passed away : कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री जेनमा कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले...

Mahesh Kothare's mother and veteran artist Jenma Kothare passed away due to old age | महेश कोठारे यांच्या आई तथा ज्येष्ठ रंगकर्मी जेनमा कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

महेश कोठारे यांच्या आई तथा ज्येष्ठ रंगकर्मी जेनमा कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

googlenewsNext

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे (वय ९३) यांचे आज सायंकाळी कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे, नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जेनमा कोठारे यांचे मूळ नाव सरोज. माहेरच्या त्या तळपदे. १९ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला होता. जेनमा यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच जेनमा यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने जेनमा आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. १९५२ मध्ये त्यांचा विवाह झाला. ‘जेनमा’ हे टोपण नाव त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. जेनमा आणि अंबर कोठारे यांनी कालांतराने ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे ते विविध नाटके सादर करीत असत. ‘लग्नाची बेडी’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात जेनमा आणि अंबर कोठारे यांनी एकत्र काम केले होते. 

महेश कोठारे यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रगतीसाठी जेनमा यांनी उत्तरोत्तर विशेष मेहनत घेतली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे सहा दशकांपूर्वी त्यांनी महेश यांचे शालेय शिक्षण सांभाळून त्यांना चित्रीकरणात सहभागी होऊ दिले होते. महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून ज्या गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान जेनमा महेशसोबत सतत असायच्या. कालांतराने महेश कोठारे यांनी निर्मिलेल्या प्रत्येक चित्रपटामध्ये पडद्यामागे राहून त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. 

महेश कोठारे यांनी चित्रनिर्मितीला सुरुवात केली ती ‘धुमधडाका’ चित्रपटापासून. या चित्रपटाची निर्मिती महेश कोठारे यांनी ‘जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल’ या बॅनरद्वारे केली होती. ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’ आदी यशस्वी चित्रपटांची निर्मिती या बॅनरतर्फे करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचेही निधन झाले आहे.

Web Title: Mahesh Kothare's mother and veteran artist Jenma Kothare passed away due to old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.